राज्य सरकारने आधार ओळखपत्र काढण्याचे काम जिल्हय़ात आमच्या अलंकित कंपनीला दिले असून आपण या कंपनीचे कर्मचारी आहोत, असे सांगून प्रत्येकी ३० रुपयांत आधार कार्ड काढून देणाऱ्या युवकाला परळी शहर पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्यावर शहर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
जालना जिल्हय़ातील परतूर येथील अब्राल जमील पठाण (वय २०) हा युवक गुरुवारी परळी शहरातील मलिकपुरा भागात विविध घरांमध्ये जाऊन आपण अलंकित कंपनीचे कर्मचारी असून ३० रुपयांत आधार कार्ड देतो, असे सांगून फॉर्म भरून फोटो व कागदपत्रे पुरावे जमा करीत असल्याची माहिती नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे यांना मिळाली. त्यांनी लगेच या घटनेची माहिती शहर पोलीस ठाण्याला दिली. पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी मलिकपुरा भागात पथक पाठवून या युवकास पकडले.
या वेळी आधार कार्ड काढून घेण्यासाठी मोठी गर्दी त्या ठिकाणी पथकास निदर्शनास आली. दरम्यान, हा युवक अलंकित कंपनीचा कर्मचारी आहे का, तसेच त्याने आणखी कुठे कुठे अशा प्रकारे लोकांची फसवणूक केली आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.