कल्याण-डोंबिवली पालिकेच्या नेतिवली टेकडीवर जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी आणलेले ४० फूट लांबीचे एकूण ६९ पाइप दोन वर्षांपूर्वी चोरटय़ांनी चोरून नेले आहेत. या पाइपची किंमत १ कोटी ३ लाख रुपये आहे. १६ सप्टेंबर २०११ रोजी याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला तरी अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पालिका प्रशासन आणि पोलिसांनी ही फाइल लालफितीत ठेवल्याने करदात्या जनतेचे एक कोटी रुपये चोरांच्या खिशात गेले असल्याची टीका होत आहे.
पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद कुलकर्णी याविषयी मौन बाळगून का बसले आहेत? सर्वपक्षीय नगरसेवक विशेषत: शहराचे नवनिर्माण करणारा विरोधी पक्ष या महत्त्वाच्या विषयांबरोबर या विषयातही मिठाची गुळणी धरून बसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. फुटकळ विषय सभा तहकुबी, लक्षवेधीद्वारे मांडणारे नगरसेवकही याविषयी एकही शब्द उच्चारत नसल्याने पाणी मुरतेय कोठे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
डोंबिवली शहराला पालिकेकडून मुबलक पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून पाणीपुरवठा विभागाने कल्याणजवळील नेतिवली टेकडीवर ४० कोटी रुपयांचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय सन २००९मध्ये घेतला. या प्रकल्पासाठी ठाण्याच्या नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी व सेठ मसुरकर कंपनी यांनी खोपोलीच्या विशाल निर्मिती कंपनीकडून १ कोटी किमतीचे ४० फूट लांबी, सहा इंच व्यास, प्रत्येकी ३ टन २७८ किलो वजनाचे नवीन लोखंडी पाइप खरेदी केले होते. हे पाइप कचोरेगाव, खंबाळपाडा व टाटा पॉवर अशा तीन ठिकाणी मोकळ्या जागेत ठेवण्यात आले होते. १६ सप्टेंबर २००९ रोजी हे पाइप चोरीला गेल्यानंतर कंपनी कर्मचारी भागिरथी जेना यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
हे पाइप शिळफाटामार्गे दहिसपर्यंत नेण्यात आले. तेथे ते फोडून त्यामधील लोखंड काढून घेण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी एक ट्रक, जेसीबी ताब्यात घेण्यात आले होते, पण तेही नंतर टिळकनगर पोलिस ठाण्याच्या आवारातून गायब झाले. नेतिवली टेकडीवरील पाण्याचा प्रकल्प पूर्ण होत आला आहे. त्यामुळे चोरीला गेलेल्या जनतेच्या पैशातील पाइपचे काय? हे पैसे कोणाकडून वसूल करायचे? पालिकेचे आयुक्त, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, पोलीस या विषयावर का गप्प आहेत, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत.