भिवंडी तसेच कल्याण परिसरातील जबरी चोरीच्या गुन्ह्य़ात तब्बल दोन वर्षांपासून फरार असलेल्या एकास कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेने नुकतीच अटक केली असून त्याने दोन गुन्ह्य़ांत सुमारे तीन लाख ७० हजारांचा ऐवज लंपास केला होता. त्यापैकी त्याच्याकडून सुमारे तीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सर्फराज महमद हुसेन मेमन (२६) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून तो भिवंडीतील रावजीनगरमध्ये राहतो. सर्फराज त्याच्या साथीदारांसह मुंबई, कल्याण आणि भिवंडी परिसरात बॅग चोरीचे गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार आहे. कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खाडे यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे कल्याण एस.टी स्थानक परिसरात सापळा रचून सर्फराजला अटक केली.
कल्याण येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यामध्ये त्याच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल असून या गुन्ह्य़ात त्याने ९५ हजार रुपये चोरले होते. त्यापैकी वीस हजार रुपये त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत.
भिवंडी परिसरातील एक व्यक्ती बँकेमध्ये दागिने गहाण ठेवून गृहकर्ज घेण्यासाठी जात होता. त्या वेळी सर्फराजने त्याला मारहाण करून त्याच्याकडून दोन लाख ८० हजारांचा ऐवज लुटला होता.
या गुन्ह्य़ातील ऐवजही त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे. हे दोन्ही गुन्हे दोन वर्षांपूर्वी घडले असून त्यामध्ये तो फरार होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.