भविष्यात भाववाढीची चिन्हे मात्र तूर्तास जीव टांगणीला
पाऊस आणि गारपीट यांच्यामुळे पिकांच्या झालेल्या हानीचे दूरगामी परिणाम दिसण्याची भीती व्यक्त करण्यात येत असली तरी सध्या कांद्याचा दर्जा घसरलेला असल्याने बाजार समित्यांमध्ये अशा कांद्याला भाव मिळत नसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. अशा कांद्याचे करायचे तरी काय, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. गारपिटीमुळे शेतांमध्ये असलेले कांद्याचे नवीन पीक उद्ध्वस्त झाले असून बियाणेही फारसे कुठे उपलब्ध नसल्याने काही दिवसांनी कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असली तरी सध्या मात्र कांदा उत्पादक भाव नसल्याने हवालदिल झाला आहे.
कांद्याची बाजारपेठ म्हणून नाशिक जिल्ह्याकडे पाहिले जाते. राष्ट्रीय पातळीवर कांद्याचे भाव गडगडले किंवा वाढले तरी त्याचा परिणाम थेट नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठांवर होतो. यंदा पावसाने चांगली साथ दिल्याने जिल्ह्यात निफाड, येवला, देवळा, बागलाण, मालेगाव या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याची मोठय़ा प्रमाणावर लागवड केली. ऐन काढणीवर कांदा आला असताना पाऊस आणि गारपिटीचे थैमान सुरू झाले. त्यामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. त्याचा सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला. बागलाणसह निफाड तालुक्यातील गोदाकाठच्या गावांमध्ये पावसाचे पाणी शेतांमध्ये साचून राहिल्याने कांदे सडण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांनी प्रथम कांदा काढणीस सुरूवात केली. पावसामुळे बहुतांशी प्रमाणात जमिनीतील कांदा खराब झाल्याने काढणीप्रसंगीच बराचसा कांदा फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. कांद्याची एकूणच स्थिती चाळींमध्ये साठविण्यासारखी नसल्याने शेतकरी बाजार समितींमध्ये कांदा नेत आहेत. सोमवारी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेल्या कांद्यास लिलावादरम्यान केवळ २५ पैसे किलोचा भाव मिळाल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन करून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. पाऊस आणि गारपीट यांच्या तडाख्यातून बचावलेल्या मालाची विक्री करून जो धोडाफार पैसा मिळेल त्यावर काही दिवस तग धरता येईल, असा शेतकऱ्यांचा हिशेब आहे. परंतु व्यापाऱ्यांकडूनही शेतकऱ्यांची अशा प्रकारे थट्टा होऊ लागल्याने शेतकरीवर्ग संतप्त होणे साहजिकच आहे.
अलिकडेच लागवड केलेला कांदा जून-जुलैमध्ये काढणीस येऊ शकतो. ज्या ठिकाणी गारा न पडता केवळ पावसावर निभावले. अशा काही भागात कांदा बऱ्यापैकी उभा आहे. हा कांदा दोन किंवा तीन महिन्यानंतर जेव्हां विक्रीसाठी बाजारात येईल. तेव्हा त्यास बऱ्यापैकी भाव मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो. कारण पाऊस आणि गारपीट यामुळे कांद्याचे नुकसान झालेले प्रमाण अधिक आहे. त्यातच बियाणांसाठी ज्या शेतकऱ्यांनी मदार होती. ते पीकही जमीनदोस्त झाल्याने लागवडीसाठी कांद्याचे बियाणे मिळणेही मुश्किल आहे.
या सर्व परिस्थितीचा विचार करता भविष्यात कांद्याचे भाव वाढू शकतील. परंतु सध्या भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष धुमसत आहे. या असंतोषाचा चटका लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी ग्रामीण भागात फिरणाऱ्या राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बसत आहे. थातूरमातूर आश्वासन देऊन ही मंडळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून आपली सुटका करून घेत असली तरी त्यांच्या दु:खामुळे कार्यकर्तेही अस्वस्थ होत आहेत.