नवी मुंबई महानगरपालिका विरोधी पक्ष नेत्या सरोज पाटील यांनी पावसाळय़ात भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी ऐरोली-दिघा परिसरात पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्यानंतर प्रशासनाने नालेसफाई केल्याचा दावा फोल ठरल्याचा आरोप सरोज पाटील यांनी केला आहे. या ठिकाणी केवळ ४० टक्केच नालेसफाई झाली असून झोपडपट्टी भाग यंदाही पावसात बुडणार असल्याची भीती पाटील यांनी व्यक्त केली. प्रशासनाने तातडीने सफाई मोहीम हाती घेण्याची मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वीच ऐरोली-दिघा परिसरात नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी मान्सूनपूर्व पाहणी दौरा केला. या वेळी मान्सूनपूर्व कामे डेडलाइनमध्ये होणार असल्याचे जऱ्हाड यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर ऐरोली मतदारसंघाचे आमदार संदीप नाईक यांनी पाहणी केला असता दिघा येथील मान्सूनपूर्व कामे समाधानकारक असल्याचा दावा करीत स्थानिक लोकप्रतिनिधींचे कौतुक करून तोंडसुख घेतले होत, तर ऐरोली येथील मान्सूनपूर्व कामे समाधानकारक नसल्याची खंत व्यक्त केली होती. त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांना तत्काळ नालेसफाई करण्याचे निर्देश दिले होते. मंगळवारी पालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या सरोज पाटील यांनी दिघा-ऐरोली परिसराचा मान्सूनपूर्व कामाचा आढावा घेतला. पाहणी दौऱ्यात ऐरोली सेक्टर-१९ मधील स्वस्तिक वृंदावन सोसायटीसमोरील गार्डन व गार्डनच्या पदपथाची झालेली दुरवस्था, डेब्रिजचे ढिगारे, सार्वजनिक शौचालयांची झालेली मोडतोड आदी समस्या जाणून घेत तत्काळ समस्या सोडवण्याची मागणी केली.
दिघा परिसरातील बिंदुमाधवनगर, गणेशनगर, फुलेनगर, गणपतीपाडा, इलठणपाडा, विष्णूनगर या ठिकाणी असणारे छोटे नाले पूर्णता स्वच्छ करण्यात न आल्याने नाराजी व्यक्त केली. पालिका प्रशासनाकडून सफाई मोहीम गांभीर्याने राबविण्यात येत नसल्याबद्दल पाटील यांनी संताप व्यक्त करीत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. या ठिकाणी सफाई झाल्यानंतर काही नागरिक पुन्हा कचरा आणून टाकतात. या विषयावर पाटील यांनी अधिकाऱ्यांनी त्यासाठी काय उपाययोजना केल्या याबाबत विभाग अधिकारी तांडेल यांना जाब विचारला. ऐरोली येथे नाल्यालाजवळ असणाऱ्या उघडय़ा केबलच्या वायरी सिडकोनिर्मित गृहसंकुलाजवळ न झालेली नालसफाई याबाबत स्थानिक नागरिकांनी विभाग अधिकारी साहेबराव गायकवाड कुचकामी ठरत असल्याचे पाटील यांच्या निर्देशनास आणून दिले. याबाबतही विरोधी पक्ष नेत्या पाटील यांनी पावसाळय़ात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास प्रभाग अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरले जाईल असे सूचित केले.  
या संदर्भात दिघा विभाग अधिकारी शशिकांत तांडेल म्हणाले की, दिघा परिसर हा झोपडपट्टी विभागामध्ये असल्यामुळे या ठिकाणी नालेसफाई झाल्यानंतर तत्काळ दिघा परिसरातील रहिवासी नाल्यांमध्ये कचरा आणून टाकतात. त्यामुळे नालेसफाई केल्यानंतरदेखील नाल्यात पुन्हा कचरा साचत असल्याचे सांगत सफाई मोहीम राबविण्याचे स्पष्ट केले.