शहरातील ‘दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा गुरूकुल’ चे नियोजन आयोगाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी उद्घाटन होणार असून यानिमित्त गुणवंतांचा सत्कार समारंभ व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. यजुर्वेन्द्र महाजन यांनी केले आहे.
दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाअभियानच्या माध्यमातून २१ हजार विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या ग्रामीण भागातील ५०० विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा परीक्षा नि:शुल्क प्रशिक्षण प्रकल्पास ‘दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा गुरुकूल’ असे नाव देण्यात आले आहे. शहरातील खान्देश सेंट्रल मॉलच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार असून या वेळी डॉ. जाधव यांचे ‘यशस्वी जीवनाची सूत्रे’ या विषयावर व्याख्यान होईल. नाशिक विभागाचे आयुक्त रवींद्र जाधव, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शिंदे, डॉ. के. बी. पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, अ. ध. वसावे, डॉ. रवींद्र टोणगावकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या विषयीची चित्रफीत या वेळी दाखविण्यात येणार असून किरण देसले लिखीत ‘दीपस्तंभ परीक्षा: अर्थशास्त्र भाग दोन’ या पुस्तकाचे डॉ. जाधव यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे.