दिंडोरी तालुक्यातील वणी पोलीस ठाण्यातंर्गत पुन्हा नव्या जोमाने अवैध मटका व्यवसाय सुरू झाला असून, या  व्यवसायास गेल्या काही दिवसांपासून अधिकृत परवाना मिळाला की काय अशा आविर्भावात ही मंडळी आहेत.
तीर्थक्षेत्र म्हणून नावलौकीक असलेल्या वणी गावात पोलिसांची अवैध व्यावसायिकांना मूक संमती असल्यासारखे वातावरण आहे. पोलीस अधीक्षक प्रवीण पडवळ यांनी अवैध व्यावसायिकांविरोधात कडक कारवाईचे निर्देश दिलेले असताना वणीमध्ये मात्र त्यांचा आदेश खुंटीला टांगल्याचे दिसत आहे. गृहराज्यमंत्र्यांच्या अंगरक्षकाची सेवा निभावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात हे पोलीस ठाणे येते.
मध्यंतरी पोलीस उपअधीक्षक शिलवंत ढवळे यांनी तीन महिने वणी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता. तीन महिन्याच्या कालावधीत त्यांनी अवैध व्यावसायिक, रोडरोमियो बेकायदा वाहतूक आणि इतर असामाजिक तत्वांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यामुळे वणीमध्ये कायद्याचे राज्य प्रस्थापित झाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. मात्र त्यांचा कार्यकाल संपताच कायद्याचे राज्यही संपले. अवैध व्यावसायिकांनी पुन्हा डोके वर काढले असून, खुलेआम त्यांचे व्यवसाय सुरू आहेत. पोलिसांच्या लेखी मात्र परिस्थिती आलबेलच आहे.