अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीचा सामना करताना प्रगतीचा वेग कायम ठेवून कृषी, उद्योग, व्यापार आदी क्षेत्रात सामान्य जनतेच्या हिताचे महत्त्वाचे निर्णय घेऊन अनेक क्षेत्रांत भरीव कामगिरी केली असे सांगून येणाऱ्या काळात अ‍ॅडव्हाण्टेज विदर्भामुळे विदर्भाचा विकास होऊन अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले.
कस्तुरचंद पार्कमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या ६४ व्या वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात मोघे बोलत होते. राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देताना शिवाजीराव मोघे म्हणाले, राज्य शासन लोकाभिमुख, गतिमान प्रशासन व सामान्य नागरिकांच्या दैनिक कामकाजाशी निगडित प्रश्न सोडविण्यासाठी सुवर्ण जयंती राजस्व अभियान महत्त्वाकांक्षी योजना राबवित आहे. या योजनेमुळे गावात बंद झालेले पांदण रस्ते सुरू करणे, मंडळ मुख्यालयी फेरफार अदालती घेणे, आधार कार्डच्या आधारे शासकीय योजनांचा लाभ देणे अशी कामे करून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले गेले आहे. राज्यात जादूटोणा विरोधी कायदा करून राज्याने देशात नवा आदर्श निर्माण केला आहे. तसेच शेतकऱ्यांची सावकारापासून पिळवणूक होऊ नये म्हणून महाराष्ट्र सावकारी कायद्याचा अध्यादेश पारित केला.
अ‍ॅडव्हाण्टेज  विदर्भामुळे १४ हजार ५३४ कोटी रुपये गुंतवणुकीच्या २७ मोठय़ा उद्योग समूहासोबत करार केला. सध्या ६९२ कोटींचे पाच प्रकल्प सुरू झाले असून ६ हजार ६१५ कोटी रुपयांच्या सहा प्रकल्पाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. ४ हजार ३४१ कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या सात प्रकल्पाने जमिनी ताब्यात घेतल्या आहेत, तर सार्वजानिक क्षेत्रातील भेल कंपनीने भंडारा जिल्ह्य़ात २५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून प्रकल्पाची उभारणी केली आहे. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त ६३ वर्षांनंतर राज्य शासनातर्फे कृषी वसंत प्रदर्शन आयोजित केले जात आहे. राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना १ फेब्रुवारीपासून लागू होत असल्याचे त्यांनी सांगितले. याचा लाभ राज्यातील ७६.३२ टक्के ग्रामीण आणि ४५.३४ टक्के शहरी भागातील जनतेला लाभ होणार आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राज्यात राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील रुग्णाला रक्तासाठी धावपळ करावी लागू नये, यासाठी वाजवी दरात सुरक्षित रक्तपुरवठा करण्यासाठी ब्लड ऑन कॉल जीवन अमृत सेवा ही अभिनव योजना सुरू केली आहे असेही मोघे म्हणाले.
कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक अनूपकुमार सिंग, उपपोलीस अधीक्षक मोतीराम पाखरे, पोलीस निरीक्षक माधव गिरी, पोलीस निरीक्षक हरिराम कामडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कनोजिया यांना पोलीस शौर्यपदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. भोसला सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले. यावेळी सौरभ मोहोड (आटय़ापाटय़ा), भुवनेश्वर भलावी (हँडबॉल), वैष्णवी आखाडे (बुद्धिबळ), अशोक कापटा (क्रीडा मागदर्शक), आशुतोष कोटणीस (क्रीडा संघटक) यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.