मूळ दस्तऐवजात खाडाखोड करून फसवणूक केल्याप्रकरणी येथील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सदाशिव गायकवाड, तसेच विद्यासागर विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक संजय टाकळगव्हाणकर यांच्यासह सातजणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश येथील प्रथम सत्र न्यायालयाने २ जानेवारीला सुनावले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे बासंबा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर इंगोले यांनी सांगितले.
हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता येथील श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यासागर विद्यालयातील वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. येथील क्षीरसागर नावाच्या शिक्षकाचा हाणामारीत मृत्यू झाल्यापासून ही शिक्षण संस्था सतत वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आता पुन्हा कर्मचारी भरती प्रकरणावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे.
शेषराव लिंबाजी कदम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जून ते सप्टेंबर २००९ या दरम्यान विनोद शिंदे यांना लिपीकपदावर, तर शिवाजी कोरडे व विनोद भिसे यांना सेवकपदावर नियुक्ती देण्यात आली. अध्यक्ष म्हणून संजय नाईक, सचिव म्हणून विठ्ठल सोळंके यांनी सहय़ा केल्या. वास्तविक, हे दोन्ही पदाधिकारी शाळेत शिक्षक आहेत. मुख्याध्यापक टाकळगव्हाणकर, तसेच विश्वनाथ कोरडे, दत्तात्रय पोकळे या शिक्षकांसह कोषाध्यक्ष बंडू ऊर्फ फकिरा जाधव यांनी या भरती प्रक्रियेत भाग घेतला. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातून भरती झालेल्या तिन्ही शिक्षणसेवकांच्या पदांना मान्यता मिळवून घेतली. यात शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी कोणतीही शहानिशा न करता पदांना मान्यता दिली. याबाबत संस्थेचे उपाध्यक्ष शेषराव कदम यांनी बासंबा पोलिसात गेल्या १२ जुलैस फिर्याद दिली. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने कदम यांनी अॅड. सुनील भुक्तर यांच्यामार्फत ३ सप्टेंबरला खासगी तक्रार दिली. यावरून प्रथम सत्र न्यायालयाने २ जानेवारीला संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.