ऐतिहासिक महागणपतीमुळे नावारूपाला आलेल्या टिटवाळ्यातील देवभूमीलाही भूमाफियांचा विळखा पडला आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेची, सरकारी, वन खात्याच्या जमिनी, पडिक जमिनींवर बेसुमार अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. मात्र कल्याण-डोंबिवली पालिकेचे अधिकारी या बाबतीत फक्त बघ्याची भूमिका घेत आहे.  
टिटवाळ्याला रम्य नदी किनारा आहे. पालिका हद्दीतील हा एकमेव निसर्गरम्य परिसर आहे. आमदार प्रकाश भोईर यांच्या प्रयत्नाने पर्यटन विकास महामंडळाने या भागातील १४ एकर जागा पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याची तयारी दर्शविली आहे. या भागात पालिकेचे बगिचे, उद्याने, शाळा, पर्यटन क्षेत्रासाठी अनेक आरक्षणे आहेत. या परिसराचा विकास केला तर नागरिकांना सुविधा मिळण्याबरोबरच पालिकेला महसूलही मिळेल. त्याचा पालिकेला सोयीस्कर विसर पडला आहे. या सर्व आरक्षणांवर माफियांनी कब्जा करून इंच इंच जमिनीवर चाळी उभारण्याचा धंदा सुरू केला आहे.
मांडा टिटवाळ्यात भाजपचे नगरसेवक आहेत. उपमहापौर बुधाराम सरनोबत या भागाचे पालिकेत नेतृत्व करीत आहेत. असे असताना भाजपच्या नगरसेवकांना ही अनधिकृत बांधकामे दिसत नाहीत का असा प्रश्न या भागातील नागरिकांकडून केला जात आहे. भूमाफियांनी या भागात कॉर्पोरेट कार्यालये सुरू केली आहेत. सहा ते दहा लाखापर्यंतच्या चाळीमधील खोल्या ग्राहकांना स्टॅम्प पेपरवर व्यवहार करून विकण्यात येत आहेत. या व्यवहारामधून पालिका, शासनाला एक कवडीचा महसूल मिळत नाही.
बांगलादेशी नगरी
टिटवाळा परिसरात यापूर्वीच सुमारे ११ हजार अनधिकृत बांधकामे आहेत. या बांधकामांमध्ये गेले तीन वर्षांत सर्वाधिक वाढ झाली आहे. आता ही संख्या सुमारे अडीच ते तीन हजार असल्याचे सांगण्यात येते. यामध्ये चाळी, व्यापारी गाळे आणि इमारतींचा समावेश आहे. या बांधकामांच्या जाहिराती हिंदी व अन्य भाषीक वृत्तपत्रांमध्ये देण्यात येतात. त्यामुळे मुंबईतील झोपडपट्टी भागातील परप्रांतीय नागरिक, विशेषत: बांगलादेशी नागरिक मोठय़ा संख्येने या भागात घरे घेण्यासाठी येत असल्याचे सांगण्यात येते. येत्या काही दिवसात टिटवाळा ही बांगलादेशी नागरिकांची वसाहत म्हणून नावारूपाला येण्याची भीती स्थानिक रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
पालिकेकडून नागरी सुविधा
या सर्व अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी पोहच रस्ते नसताना पालिकेकडून तत्परतेने पाणी, महावितरणकडून वीज पुरवठा करण्यात येत आहे. या सर्व वस्त्या अनधिकृत असताना त्यांना पालिकेकडून पाणीपुरवठा कसा केला जातो, असा राहिवाशांचा सवाल आहे. टिटवाळा पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर अनधिकृत गाळे उभारण्यात आले आहेत तरी पोलीस गप्पा का आहेत, असे प्रश्न नागरिकांकडून केले जात आहेत. आयुक्त रामनाथ सोनवणे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद कुलकर्णी, प्रभाग अधिकारी कृष्णा लेंडेकर यांनी किमान या देवभूमीवर आलेले अतिक्रमणाचे संकट दूर करावे, अन्यथा गणराज पालिका अधिकाऱ्यांची गय करणार नाही असे येथील नागरिकांकडून बोलले जात आहे.