नवी मुंबईतील पाम रोडच्या धर्तीवर बोरीवलीतही लिंक रोड, राजेंद्र नगर परिसरात पामची झाडे लावून या रस्त्यांचे सौंदर्य खुलवण्यात येणार आहे. या शिवाय येथील काही उद्यानांमध्ये व गृहनिर्माण संस्थांच्या आवारातही पामची झाडे लावण्याची योजना आहे.
गेल्या काही वर्षांत लिंक रोडला लागून अनेक इमारती, व्यापारी संकुले, मॉल उभे राहत आहेत. त्या तुलनेत वृक्षांची संख्या न वाढल्यामुळे या रस्त्याला एक प्रकारचे रखरखीत स्वरूप प्राप्त झाले आहे. इमारतींच्या या गर्दीत रस्त्यावरचे हिरवे सौंदर्य लुप्त झाल्याने निव्वळ काँक्रिटीकरणाची करडी किनार या रस्त्याला दिसून येते. पण, आता किमान बोरीवलीत तरी पामची झाडे या रस्त्याचे सौंदर्य काही प्रमाणात खुलविण्याचे काम करणार आहेत.
बोरीवलीचा भट्टड मार्ग ते डॉन बॉस्को, भट्टड मार्ग ते बोरीवलीच्या पूर्वेला असलेला पश्चिम द्रुतगती मार्ग जोडणारा रस्ता, गोराई, चारकोप येथील मोकळी उद्याने येथे पामचे वृक्ष लावण्यात येणार आहेत. या शिवाय काही गृहनिर्माण संस्थांच्या आवारातही ही सुमारे दीड फूट उंचीची झाडे लावण्यात येणार आहेत. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील मनसेचे नेते आणि उपाध्यक्ष नयन कदम यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेसमवेत चर्चा करून ही वृक्षारोपणाची योजना आखली आहे. सुमारे दीड फूट उंचीची एक हजार झाडे या निमित्ताने बोरीवलीत लावण्यात येणार आहेत.
 ‘पालिका ठरवून देईल त्या ठिकाणी आम्ही ही झाडे लावू. त्यानंतरची देखभाल पालिकेने घेण्याचे मान्य केले आहे. या शिवाय आमचे कार्यकर्तेही वेळोवेळी जाऊन या वृक्षाच्या देखभालीवर लक्ष ठेवतील, ’ असे नयन कदम यांनी सांगितले.