पाचगणी येथील टेबललॅन्ड परिसराची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून पाहणी करण्यात आली. पाचगणी येथील टेबल लॅन्डवर घोडेस्वारीस न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र घोडागाडीला परवानगी दिलेली नाही. न्यायाधीश या परिसराची पाहणी करून याबाबत निर्णय घेणार होते. त्याप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयातील न्या. व्ही. एम. कानडे यांनी परिसराची पाहणी केली. टेबल लॅन्ड परिसर पायी फिरून २० एकर व ८० एकर पठाराची पाहणी केली. घोडे व्यावसायिकांसाठी विशिष्ट पद्धतीने आखलेल्या ट्रॅकची पाहणी त्यांनी केली. नव्या ट्रॅकमध्ये घोडा व घोडागाडीस वावरताना २० फुटाऐवजी ३० फुटांचा ट्रॅक असावा किंवा कसे याबाबत माहिती घेतली. पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी आशा राऊत व शेखर कासुर्डे यांनी त्यांना माहिती दिली. २० एकरावर न्यायालयाने घोडेस्वारीस परवानगी दिली असेल तरीही त्या परिसरात प्रेक्षणीय स्थळ नाही मात्र, इतर भागात चांगली प्रेक्षणीय स्थळे आहेत. येथे घोडागाडी स्वारीस परवानगी द्यावी असेही घोडागाडी मालकांची मागणी आहे.या परिसराची पाहणी केल्यानंतर घोडागाडी बाबत निर्णय न्यायालय घेणार आहे.