आयटीप्रणीत मनपा कामगार कर्मचारी युनियन व महापालिका यांच्यात यशस्वी वाटाघाटी झाल्याने बुधवारी मनपा कर्मचाऱ्यांनी आपला संप अखेर मागे घेतला. वाटाघाटीत थकीत ४ महिन्यांच्या वेतनापैकी २ महिन्यांचे वेतन उद्याच (गुरुवारी) रोख स्वरूपात अदा करण्याचे ठरले.
सोमवारपासून स्वच्छता, पाणीपुरवठा, उद्यान व वीज विभागांतील ५०० कर्मचारी बेमुदत संपावर होते. चार महिन्यांचे थकीत वेतन द्यावे, ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी होती. युनियनने इतरही ३५ मागण्या केल्या होत्या.
दोन दिवस युनियनचे प्रतिनिधी व महापालिकेत चर्चा न झाल्यामुळे दिवाळीच्या सणावर तोंडावर संप लांबण्याची चिन्हे दिसत होती. बुधवारी युनियननने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असे मंगळवारी सायंकाळी जाहीर केले. परंतु महापौर प्रताप देशमुख यांनी युनियनचे प्रतिनिधी राजन क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधून थकीत वेतनासंबंधी आयुक्त सुधीर शंभरकर यांच्याशी चर्चा करावी, असे सुचविले.
पालिकाआयुक्त शंभरकर, स्थायी समितीचे सभापती विजय जामकर, भाजपचे सदस्य दिलीप ठाकूर, युनियनचे प्रतिनिधी राजन क्षीरसागर, श्रावण कदम, दादासाहेब शिंदे, भगवान कनकुटे यांच्यात दुपारी  तासभर चर्चा झाली.
या चर्चेप्रसंगी शंभरकर यांनी मनपाची आर्थिक स्थिती सध्या ठीक नसल्यामुळे थकीत ४ महिन्यांच्या वेतनापैकी २ महिन्यांचे वेतन लागलीच अदा केले जाईल, असे आश्वासन दिले.
 दुपारनंतर युनियनने संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. उद्या कामगारांना दोन महिन्यांचे वेतन मिळणार आहे. वेतनाच्याच मागणीसाठी बुधवारपासून महापालिका सफाई कामगार संघटना संपात उतरली होती. या संघटनेनेही संप मागे घेतला.