राज्य व केंद्र सरकार जनतेसाठी विविध योजना सुरु करते, मात्र या योजनांची अंमलबजावणी करताना सरकारने अधिकाऱ्यांबरोबरच स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेतल्यास योजना अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचतील, अशी अपेक्षा खासदार दिलीप गांधी यांनी व्यक्त केली.
स्वर्णजयंती राजस्व अभियान अंतर्गत विस्तारित समाधान योजनानिमित्त विविध सरकारी योजनांची माहिती देणारे प्रदर्शन व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन नगर तहसील कार्यालयाच्या वतीने टाकळी काझी (ता. नगर) येथे आज करण्यात आले होते, त्याच्या उद्घाटन प्रसंगी खा. गांधी बोलत होते. समाजाच्या उन्नतीसाठी आपण काम करतो आहोत, ही भावना ठेवून अधिकाऱ्यांनी काम करावे. विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन अधिकाऱ्यांनी समाजमन ओळखावे, त्याचा फायदा योजना राबवताना होईल. तसेच, स्वत:बरोबरच लोकांनाही त्याचा फायदा होईल, असे गांधी म्हणाले.
विविध योजनांचा लाभ देताना शासकीय अधिकाऱ्यांनी एकसूत्रता ठेवावी, त्यासाठीच समाधान योजना सुरु करण्यात आली, त्याचा लाभ लोकांनी घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले. या वेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शालेय विद्यार्थी, लाभार्थ्यांना जातीचे व रहिवासाचे दाखले, संजय गांधी निराधार योजनेतील कुटुंब अर्थसाहाय्य, दुबार शिधापत्रिका, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, नैसर्गिक आपत्ती अनुदान, अन्न सुरक्षा योजनेतील अन्न वाटप, तसेच कृषी आरोग्य, सामाजिक वनीकरण योजनेतील लाभाथींना अनुदान, साहित्य वाटप करण्यात आले.
प्रांताधिकारी राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविकात गेल्या तीन वर्षांत सुवर्णजयंती राजस्व अभियानात तालुक्यातील शाळांतून १८ हजार ८८४ विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्यांचे वाटप, लोकसहभागातून १५ पाणंद रस्ते मोकळे केले व फेरफार अदालतमध्ये २०३ नोंदी करण्यात आल्याची माहिती दिली. या वेळी माजी खासदार दादा पाटील शेळके, बन्सीभाऊ म्हस्के, परसराम भगत आदींची भाषणे झाली. तहसीलदार राजेंद्र थोटे यांनी आभार मानले. अमोल बागुल यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी जिल्हा बँक संचालक संपत म्हस्के, जि.प. सदस्य बाळासाहेब हराळ, बीडीओ लक्ष्मीनारायण मिस्त्र तसेच विविध गावचे सरपंच पदाधिकारी उपस्थित होते. प्रदर्शनात विविध खात्यांनी एकूण २५ स्टॉल्स उभारले होते.