नेवासे येथे गोळीबारात शहानवज नवाबखान पठाण (वय ६५) या व्यापाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून सचिन पांडुरंग घोरतळे (वय २७) यास येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. कुलकर्णी यांनी ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील तिघे आरोपी फरार असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महेश शिवराम मापारी यांच्यासह चौघा आरोपींची न्यायालयाने निदरेष मुक्तता केली.
नेवासे येथे दिवाळीच्या काळात दि. २४ ऑक्टोबर २०११ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लक्ष्मण जगताप यांच्या मालकीच्या लक्ष्मी एजन्सी या दुकानात सचिन घोरतळे हा आला. दुकानात त्यावेळी लक्ष्मण जगताप यांचे चिरंजीव कमलेश हे होते. त्यावेळी त्याने २५ हजार रुपयांची खंडणी दिली नाही म्हणुन जगताप यांच्या दिशेने गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. पण जगताप हे आत पळाल्यामुळे बचावले. मात्र जगताप यांच्याकडे दूरदर्शन पहायला आलेले शेजारच्या दुकानातील सुपर अॅटोमोबाईल्सचे मालक शहानवाजखान पठाण हे गोळी लागून जखमी झाले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खून, खंडणी, बेकायदा शस्त्र बाळगणे आदी कलमान्वये नेवासे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी सचिन घोरतळे हा फरार झाला होता. पोलिसांनी तपास करून अटक केली. तपासात घोतळे याला पप्पु, संभाजी गिरे याने पळन जाण्यासाठी मदत केली असे निष्पन्न झाले. मापारी यांनी राजेंद्र कारभारी काळे यांच्या वाडय़ात बैठक घेतली. दुकानदारांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी मागण्याचे या बैठकीत ठरले. तसेच गिरे याने घोरतळे याला गोळीबार शिकवला व सराव करून घेतला. तपासात घोरतळे याच्यासह सात आरोपींचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याविरूद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
गुन्ह्यातील आरोपी सोन्या उर्फ सुनील परदेशी, पवन सोमनाथ नरूला, रवी राज भालेराव हे तिघे फरार आहेत. तर महेश मापारी, पप्पू संभाजी गिरे, राजेंद्र कारभारी काळे, संतोष जगन्नाथ पंडुरे या चौघांची न्यायालयाने निदरेष मुक्तता केली. सदोष मनुष्यवधाबद्दल सचिन घोरतळे यास सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारच्या वतीने वकिल प्रमोद वलटे यांनी काम पाहिले.
खंडणी मागण्याचा कुठलाही कट झालेला नसल्याने तसेच घोरतळे वगळता अन्य चौघांचा घटनेशी कुठलाही संबंध नसल्याचे आढळल्याने पुराव्याअभावी मापारी यांची न्यायालयाने निदरेष मुक्तता केली. आरोपी घोरतळे याने वापरलेल्या पिस्तुलाच्या गोळ्यांनीच शहानवाजखान यांचा मृत्यू झाल्याचा न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल तसेच जगताप व त्यांच्या दुकानातील कामगाराने ओळखलेले कपडे या पुराव्याच्या आधारे न्यायालयाने त्यास सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. खटल्यात चौदा साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. सरकारी वकील वलटे यांनी काम पाहिले. या खटल्याकडे नेवासे तालुक्याचे लक्ष लागले होते.