डॉक्टर संपावर आहेत, या फलकानेच सर्व रुग्णालयात गुरुवारी रुग्णांचे स्वागत झाले. निवासी डॉक्टरांच्या संपाची कल्पना असूनही नाइलाजास्तव आलेल्या अनेक रुग्णांचे या संपामुळे हाल झाले. तातडीच्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी विभागप्रमुख व प्राध्यापक यांनी ओपीडी गाठली असली तरी ‘मार्ड’च्या संपाचा परिणाम झालाच. केईएममध्ये केवळ ५६ रुग्णांना दाखल करून घेतले असले तरी सायनमध्ये ओपीडी बंद ठेवण्याची वेळ आली. जेजेमध्ये ओपीडी सुरू ठेवली तरी मोठय़ा शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या. नायरमध्येही संपाचा फटका बसला.
सकाळी सात वाजण्यापूर्वीपासूनच केईएम, सायन, नायर, जे जे रुग्णालयाच्या बाह्य़रुग्ण कक्षातील रुग्णांच्या भल्या मोठय़ा रांगा लागलेल्या असतात. आजही या रांगा सकाळी लागल्या, मात्र बाह्य़रुग्ण कक्ष चालवणाऱ्या निवासी डॉक्टरांनी संप पुकारल्याने रुग्णांचे हाल झाले. केईएममध्ये प्रवेशद्वारावरच डॉक्टरांच्या संपाची माहिती देणारा फलक लावला होता. मात्र तरीही रुग्ण व त्यांचे नातेवाईक अपेक्षेने ओपीडीमध्ये जात होते. प्रसूतीसाठी नाव दाखल करायला आलेल्यांपैकी केवळ आठव्या व नवव्या महिन्यातील गर्भवतींना केईएमच्या ओपीडीमध्ये तपासण्यात आले. त्यातील तातडीने दाखल करण्याची आवश्यकता असलेल्या महिलांखेरीज इतर सर्वाना पुढच्या ओपीडीमध्ये येण्यास सांगण्यात आले. याही स्थितीत केईएममध्ये दुपापर्यंत पाच प्रसूती सुखरूप पार पडल्या होत्या. रुग्णांना कमीत कमी त्रास व्हावा, याचा प्रयत्न आहे. तातडीच्या रुग्णांना प्राधान्य देण्यात येत आहे, असे केईएमचे वरिष्ठ साहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण बांगर म्हणाले. केईएममधील सर्व ओपीडीमध्ये दुपारीही गर्दी दिसत होती. मात्र अधिकाधिक रुग्णांना तपासण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या होत्या. नायरमध्येही फारशी वेगळी स्थिती नव्हती. बाह्य़रुग्ण कक्ष सांभाळणारे निवासी डॉक्टरच रजेवर गेले असल्याने नायरच्या ओपीडीची व्यवस्थाही विस्कळीत झाली होती. सकाळीच नायर रुग्णालयाच्या बाहेर संपकरी डॉक्टरांनी फलक झळकावत निदर्शने केली. राज्य सरकारच्या जे जे रुग्णालयात नेहमीप्रमाणे ओपीडी सुरू ठेवण्यात आली. प्राध्यापकांनी ओपीडीमध्ये रुग्ण तपासण्यास सुरुवात केली होती. मात्र निवासी डॉक्टर उपलब्ध नसल्याने अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ आली. अनेक दिवसांनी शस्त्रक्रियेची वेळ मिळालेल्या रुग्णांना त्यामुळे निराश व्हावे लागले.
* महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्शिअल डॉक्टर्स (मार्ड) या संघटनेचे राज्यभरात चार हजारहून अधिक सदस्य
* मुंबईतील केईएम, सायन, नायर ही तीन पालिका रुग्णालये तसेच जेजे, सेंट जॉर्ज, जीटी आणि कामा ही राज्य सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टर संपामध्ये सहभागी
* याशिवाय राज्यातील इतर १३ वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरही संपात सहभागी.
* क्षयरोग, प्रसुतीसाठी दोन महिन्याची भरपगारी रजा, कामाचे तास कमी करणे, प्रत्येकाच्या विशेष अभ्यासाप्रमाणे बॉण्डसाठी जागा देणे, इतर मागासवर्गीय जाती, जमातींसाठी अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या फ्रीशीपचा मुद्दा, डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, डॉक्टर सुरक्षा कायद्याची कडक अंमलबजावणी हे मुद्दे संपाला कारणीभूत आहेत.