राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ‘एनडीए’मध्ये आल्यास आपणास आनंदच होईल, असे भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दानवे भाजपकडून दोनदा विधानसभेवर आणि तीन वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. आता चौथ्यांदा त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. या पाश्र्वभूमीवर त्यांचे पक्षाच्या जिल्हा कार्यालयात भाजप, शिवसेना व रिपाइंच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर देताना दानवे म्हणाले की, येत्या ७ फेब्रुवारीला भाजपच्या राज्यातील कोअर कमितीची बैठक होणार आहे. त्यात ‘एनडीए’मध्ये एखादा पक्ष सहभागी होऊ शकतो का, याचा विचार होणे अशक्य नाही. पवार ‘एनडीए’मध्ये आले, तरी आमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार अगोदरच निश्चित झाला आहे, असे दानवे म्हणाले.
एका सर्वेक्षणात आपणास मौनी खासदार म्हटल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करून दानवे म्हणाले की, लोकसभेत अडीचशे प्रश्न विचारले व अडीच हजारपेक्षा अधिक विषयांवरील चर्चा केली, मग मी मौनी खासदार कसा? बारा सिलेंडर अनुदानावर देण्याबाबत प्रश्न आपण लोकसभेत विचारला होता, असेही ते म्हणाले. निवडणूकपूर्व काळात मोदी यांच्या दोन जाहीर सभा मराठवाडय़ात होणार असून, पैकी एक सभा जालना मतदारसंघात होईल. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात भाजपच्या देशातील २०० उमेदवारांची नावे जाहीर होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.