येथील केंजळ गावाच्या हद्दीत मक्याच्या दाण्यातून विषारी औषधाद्वारे मोरांची हत्या करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये एका मोराचा मृत्यू तर दोन मोरांवर उपचार सुरू आहेत.
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार केंजळ गावाच्या हद्दीत हरीण आणि मोरांचे मोठय़ा प्रमाणात वास्तव्य आहे. या गावच्या शिवारातच जगन्नाथ गायकवाड यांच्या शेतालगत आज बेशुद्ध अवस्थेत तीन मोर आढळले. वन कर्मचाऱ्यांनी त्यांना भुईंज येथील वनविभागाच्या कार्यालयात आणून त्यांच्यावर उपचार सुरू केले. दरम्यान यातील एका मोराचा मूत्यू झाला असून अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान या मोरांपासून पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कुणीतरी मक्याच्या दाण्यातून विष देत या मोरांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा संशय वनक्षेत्रपाल एस. सी. साळुंखे यांनी व्यक्त केला आहे. या घटनेबाबत त्यांनी पंचनामा करत अज्ञान व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.