केंद्र सरकारच्या ‘एनसीईआरटी’च्या वतीने तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमात महाराष्ट्राच्या इतिहासावर घोर अन्याय झाला असून इतिहासाची विकृत मांडणी करताना सहावी ते बारावीपर्यंतच्या पुस्तकांमधून नव्या पिढीच्या भावना दूषित करण्याचे काम केले जात आहे. ही पुस्तके मागे घ्यावीत, तसेच या पुस्तकांची निर्मिती करणारे मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली.
भंडारी हे एका व्याख्यानानिमित्त येथे आले होते. या वेळी त्यांनी ‘एनसीईआरटी’च्या वतीने तयार केलेल्या सहावी ते बारावीच्या पाठय़पुस्तकांबाबत आपली भूमिका विशद केली. माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश चिटणीस विजय गव्हाणे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे, जि. प. सभापती गणेश रोकडे, श्रीनिवास मुंडे, अभय चाटे, शहराध्यक्ष अजय गव्हाणे, राजेश देशपांडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्याचे काम एनसीईआरटीने चालवले आहे. हा अभ्यासक्रम तयार करणारे २५पकी १९ सदस्य दिल्लीतील आहेत. परंतु त्यांचा महाराष्ट्राशी काडीमात्र संबंध नाही. महाराष्ट्रातील तज्ज्ञ अभ्यास समितीत नसल्याने इतिहासाचे विकृतीकरण मोठय़ा प्रमाणावर झाले आहे. इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या इतिहासाच्या एकूण दहा पुस्तकांमध्ये मराठय़ांचा इतिहास केवळ दोन पानांत संपविण्यात आला असून, छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या कर्तृत्वालाही योग्य न्याय देण्यात आला नाही. या इतिहासात राजमाता जिजाऊ, शहाजीराजे, छत्रपती संभाजीमहाराज, राजाराममहाराज, महाराणी ताराबाई यांचा कोणाचाही उल्लेख नाही, तर मराठय़ांच्या औरंगजेबाविरुद्धच्या २७ वर्षांच्या देदीप्यमान स्वातंत्र्यलढय़ाची दखलही घेण्यात आली नाही, याकडे भंडारी यांनी लक्ष वेधले.
या बरोबरच अठराव्या शतकातील योद्धा बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, सदाशिवराव भाऊ, मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर, दत्ताजी िशदे या थोर शुरांचा समावेश नाही. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे अनेक मुघल बादशाह, त्यांचे वजीर, मनसबदार यांची विस्तृत माहिती आणि चित्रे मात्र देण्यात आली आहेत. एवढेच नाही, तर िहदुस्तानावर आक्रमण करून प्रचंड कत्तली आणि लूट करणाऱ्या नादीरशाहचे पानभर चित्र पुस्तकात दिले आहे. महाराष्ट्रातल्या महान संतांचाही या इतिहासाच्या अभ्यासकांना विसर पडला आहे. १९ व्या शतकातील थोर सामाजिक सुधारकांचाही इतिहासात उल्लेख नसून सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, भारतरत्न धोंडो केशव कर्वे, विठ्ठल रामजी िशदे, राजर्षी शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा इतिहासाच्या पुस्तकात उल्लेख नसल्याचा आरोप भंडारी यांनी केला. असा विकृत इतिहास म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला असून ही सर्व पुस्तके मागे घेण्यात यावीत व हा अभ्यासक्रम तयार करणारे मंडळ बरखास्त करण्याची मागणीही भंडारी यांनी केली. या वेळी त्यांनी सिंचन घोटाळ्याकडे भारतीय जनता पक्षाचे दुर्लक्ष नसून या घोटाळ्यावर आमची भूमिका नेहमीच आक्रमक राहणार आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.