जिल्ह्य़ात प्रतिदिन साडेचार ते पाच लाख पेट्रोलची मागणी असताना विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर त्यात दहा ते पंधरा टक्क्याने वाढ झाली आहे. डिझेलच्या मागणीत मात्र कुठलीही वाढ झाली नाही. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पेट्रोलच्या मागणीत आणखी वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
विधानसभेच्या प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू झाला असून धुराळा उडणे सुरू झाले आहे. प्रत्येक शहरातील गल्लीबोळात, गावात प्रत्येक मतदारांचे कार्यकर्ते, समर्थक आणि स्वत: उमेदवार गाठी-भेटी घेत आहेत. प्रचार सभा, मिरवणुकीला जोर चढला आहे. प्रत्येक उमेदवारांच्या मागे वाहनांचा ताफा वाढला आहे. प्रत्येक उमेदवारांचे प्रचार करणारे वाहनेही रस्त्याने फिरत आहेत. त्यामुळे नागपूर शहर व ग्रामीणमध्ये पेट्रोलची मागणी वाढली आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी नागपूर शहरात साडेतीन लाख लिटर पेट्रोलची मागणी होती. त्यात एक लाख लिटरने वाढ होऊन ती आता चार साडेचार लाख एवढी झाली आहे. तर नागपूर ग्रामीणमध्ये प्रतिदिन एक लाख लिटरची मागणी असते. त्यात २५ हजाराने वाढ झाली आहे. शहरात दीड लाख तर ग्रामीणमध्ये ५ लाख लिटर डिझेलची मागणी आहे. परंतु त्यात फारसी वाढ झाली नसल्याचे विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष हरविंदरसिंग भाटीया यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
विधानसभेच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना नागपूर लोकसभा मतदारसंघातील १७ लाख तर रामटेक लोकसभा मतदारसंघातील १५ लाख मतदारांपर्यंत पोहचावे लागत आहे. त्यासाठी वाहनांची गरज आहे. वाहन म्हटले की पेट्रोल- डिझेलची आवश्यकता आलीच. शहरातील मतदारसंघाचे क्षेत्रफळ हे सिमीत आहे, तर ग्रामीण भागाचे क्षेत्रफळ विस्तृत आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागातील मतदारांशी संपर्क साधण्यासाठी वाहनांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ग्रामीण भागात शहरापेक्षा पेट्रोलची मागणी वाढली आहे. प्रत्येक उमेदवारांच्या ताफ्यात किमान पाच ते सात चारचाकी वाहने असतातच. त्यात मोटारसायकलींची संख्याही अधिक असते. आघाडीत आणि युतीत बिघाडी झाल्याने कुठे चौरंगी तर कुठे पंचरंगी लढती होत आहे. हे सर्वच प्रमुख राजकीय पक्षाचे उमेदवार असल्याने वाहनांची संख्याही आपोआपच वाढली आहे. मतदान १५ ऑक्टोबरला असल्याने प्रचाराच्या तिसऱ्या टप्प्यात १० ते १२ ऑक्टोबपर्यंत पेट्रोलच्या मागणीत आणखी वाढ होईल, असा अंदाज विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे सचिव प्रणय पराते यांनी व्यक्त केला. गेल्या काही दिवसात पेट्रोलच्या मागणीत झालेली वाढ ही निवडणुकीमुळेच आहे, हे सांगता येणे कठीण असल्याचे मत असोसिएशनचे कोषाध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांनी व्यक्त केले. नवरात्र, दसरा आणि दिवाळीनिमित्त ही मागणी वाढली असल्याचेही ते म्हणाले.