निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाल्यापासून शहर परिसरात कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या घटना सातत्याने घडत आहेत. शहरातील पेट्रोल पंपावर टोळक्याने दहशत पसरविण्याच्या उद्देशाने केलेला हल्ला हा त्याचाच एक भाग म्हणता येईल. टोळक्यातील दहा संशयितांची मंगळवारी न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.
शहरातील सारडा सर्कलजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर सोमवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास टोळक्याने हल्ला चढविला. जुने नाशिक येथील इमामशाही भागात राहणारे वाजिद अबिद सय्यद, सय्यद जाकीर हुसेन, सय्यद सलमान जाकीर, सय्यद झोमान जाकीर, फैजल जाकीर सय्यद, साजिद सय्यद, मुजिद आबिद सय्यद, जाहीर सय्यद, हसक जाकीर सय्यद आदी पेट्रोल पंपावर आले. दहशत माजविणे तसेच परिसरात घबराट निर्माण करण्याच्या हेतुने टोळक्याने पेट्रोल पंपावर लाकडी दांडके घेऊन प्रवेश केला. यावेळी टोळक्याने इंधन टाकीची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. इंधन टाकीचे झाकण उघडून त्याचे ‘नोझल कॅप’ हातोडय़ाने तोडले व टाकीत लाकडी दांडके टाकून नुकसान केल्याची तक्रार मुशीर मुनीर सय्यद यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी दहा संशयितांना अटक केली. मंगळवारी या संशयितांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने जामिनावर त्यांची मुक्तता केली. दरम्यान, आचारसंहिता लागू झाल्यापासून शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये अचानक वाढ झाल्याचे दिसत आहे. नाशिकरोड भागात युवकांच्या टोळक्याने वाहनांची जाळपोळ करून खळबळ उडवून दिली. मागील भांडणांचा वचपा काढण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले. वाहन चोरी वा मंगळसूत्र खेचून नेण्याचे प्रकारही काही केल्या कमी झालेले नाहीत. लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या व्यक्तींविरोधात कारवाई करत आहे. असे असताना शहरात काही टोळक्यांकडून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान दिले जात आहे.