मेघालयातील सीएमजे विद्यापीठाने पीएच.डी. च्या पदवीचा बाजार मांडल्याचे प्रकरण देशभर गाजत असताना या खासगी विद्यापीठाकडून सोलापुरातील सहा प्राध्यापकांनी पीएच. डी. घेतली आहे. त्यामुळे ही पीएच.डी.धारक प्राध्यापक मंडळी संकटात आली आहेत.
बनावट पीएच.डी. पदवी मिळविणाऱ्या प्राध्यापकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना व मनसेच्या विद्यार्थी शाखेने, तसेच संभाजी आरमार आदी संघटनांनी यापूर्वीच केली आहे. पाकणी येथील भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. डी. पाटील यांनी याच महाविद्यालयातील प्रा. डॉ. व्यंकटेश गड्डिमे यांनी बनावट पीएच.डी.ची पदवी धारण करून फसवणूक केल्याची तक्रार सोलापूर विद्यापीठाकडे केली आहे. तसेच पोलिसातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रा. गड्डिमे यांनी पीएच.डी. मिळविलेल्या मेघालयातील सीएमजे या खासगी विद्यापीठाने पीएचडी पदव्यांची विक्री केल्याचे आढळून आल्याने मेघालय शासनाने हे विद्यापीठ सील केले आहे. या विद्यापीठाने प्रदान केलेल्या सर्व पीएच.डी. पदव्या  रद्द करण्यात आल्या आहेत.
या वादग्रस्त सीएमजे विद्यापीठातून सोलापुरातील प्रा. व्यंकटेश गड्डिमे यांच्याशिवाय डॉ. एस. एस. कात्रे (व्हीव्हीपी अभियांत्रिकी महाविद्यालय), डॉ. बी. एस. कौलगी (ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय), डॉ. सत्यशील शहा (हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालय), प्रा. नामदेव गरड आदींनी पीएच.डी. मिळविली आहे. त्यामुळे ही सर्व पीएच.डी.धारक प्राध्यापक मंडळी संकटात सापडली आहेत. याप्रकरणी संबंधित महाविद्यालये कोणती भूमिका घेतात व सोलापूर विद्यापीठ काय कारवाई करणार, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष वेधले आहे.