महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेतर्फे विदर्भातील फार्मसी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या विद्यार्थी व बेरोजगारांसाठी व नोंदणीकृत व्यावसायिकांसाठी अमरावती येथील विद्याभारती कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ९ व १० जूनला  फार्मसी नोंदणीकरण व नूतनीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडून मान्यता प्राप्त संस्थांमधून फार्मसी पदविका (डी.फार्म.) व पदवी (बी.फार्म.) प्राप्त करणारे विद्यार्थी नोंदणीकरणासाठी अर्ज सादर करू शकतात. प्रथम येणाऱ्या २०० विद्यार्थ्यांचीच नोंदणी केली जाणार आहे. ज्या औषध व्यावसायिकांनी यापूर्वीच नोंदणी केली आहे, परंतु जुने नोंदणी प्रमाणपत्र हरवले असल्यास, नावात बदल करावयाचा असल्यास नूतनीकरण करू शकतात. तसेच नवीन व्यावसायिक नोंदणी करू शकतात. यासाठी लागणारा अर्ज व कागदपत्रांची माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शिबिरात सादर केल्या जाणाऱ्या अर्जाच्या शुल्काची पावती मुंबई कार्यालयाकडून नोंदणीकर्त्यांना प्रमाणपत्रासोबत पाठवण्यात येईल.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे सदस्य हरीश गणेशानी, अमरावती जिल्हा औषध संघटनेचे अध्यक्ष प्रा. जे.व्ही. व्यास, तसेच प्रा. ए.आर. जयस्वाल यांच्याशी संपर्क साधावा. परराज्यातून पदवी व पदविका घेतलेले विद्यार्थी व परराज्यातील नोंदणीकृत औषध व्यावसायिकांनी या शिबिरात नोंदणीसाठी अर्ज सादर करू नये, असे महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेने स्पष्टपणे म्हटले आहे.