सर्वसाधारणपणे दशावताराच्या आरतीतील ‘प्रल्हादा कारणे नरहरी स्तंभी गुरगुरसी..’ आणि श्रावण महिन्यातील जिवतीच्या पूजेकरिता लावण्यात येणाऱ्या चित्रमालिकेतील हिरण्यकशिपू राक्षसाच्या वधाचा देखावा इतकाच परिचय असणाऱ्या नृसिंह या विष्णूच्या चौथ्या अवताराच्या महाराष्ट्रातील सर्व मंदिरांचा सांगोपांग अभ्यास अंबरनाथ येथील डॉ. पूर्वा अष्टपुत्रे यांनी केला असून त्यामुळे किमान हजार वर्षांपूर्वीची वैशिष्टय़पूर्ण सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा समजून घेण्यास मोलाची मदत होणार आहे.
नृसिंह हे अष्टपुत्रे कुटुंबीयांचे कुलदैवत. त्यामुळे आपल्या या कुलदैवताच्या मंदिरांचा धांडोळा घ्यावा, या ध्यासापोटी तब्बल तीन वर्षे भ्रमंती करून डॉ. पूर्वा यांनी पती प्रमोद अष्टपुत्रे यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व १३० नृसिंह मंदिरांना भेटी दिल्याच, शिवाय कर्नाटक, आंध प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तरांचल या राज्यांमधीलही दहा नृसिंह मंदिरे पाहिली. स्थानिक पुजारी अथवा जाणकारांकडून त्यांची माहिती घेतली, छायाचित्रे काढली.  
नृसिंह मंदिरे देशभरात आढळून येत असली तरी सर्वाधिक ३५० मंदिरे आंध्र प्रदेशात आहेत. या राज्यातील अहोबिलम या एकाच ठिकाणी दहा नृसिंह मंदिरे आहेत. २००८च्या डिसेंबर महिन्यात सांगली जिल्ह्य़ातील मिरज येथील किल्ला परिसरात असलेल्या तांदळास्वरूपी नृसिंह मंदिरास भेट देऊन अष्टपुत्रे यांनी त्यांच्या शोधकार्यास प्रारंभ केला. कर्नाटकातील बिदर येथील पाण्याने भरलेल्या गुहेतील वैशिष्टय़पूर्ण नृसिंहस्थानासही त्यांनी भेट दिली. महाराष्ट्रात परभणी, सोलापूर आणि अमरावती जिल्ह्य़ात सर्वाधिक प्रत्येकी नऊ नृसिंह मंदिरे आहेत. सातारा जिल्ह्य़ात सहा आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्य़ात प्रत्येकी पाच मंदिरे आहेत. अहमदनगर, नांदेड, लातूर, यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्य़ात  प्रत्येकी चार मंदिरे आहेत. सांगली, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्य़ात प्रत्येकी तीन मंदिरे आहेत. हिंगोली, चंद्रपूर आणि नागपूरमध्ये प्रत्येकी दोन तर वर्धा, भंडारा, धुळे, जळगांव, वाशिम, अकोला व ठाणे जिल्ह्य़ात (वसई) प्रत्येकी एक नृसिंह मंदिर आहे.
स्तंभातून प्रकट होऊन मांडीवर हिरण्यकशिपू राक्षसाचे पोट फाडणाऱ्या नृसिंहाची प्रतिमा जास्त परिचयाची असली तरी विष्णूतंत्र, पाराशरस्मृती, ईश्वरसंहिता, पद्मपुराण, मरकडेय पुराणात नृसिंह अवताराची विविध वर्णने आहेत. त्यानुसार मूर्तिकारांनी उग्र नृसिंहाबरोबरच, केवलनृसिंह, योगानंद लक्ष्मीनृसिंह, योगनृसिंह, सिंहमुखी, सुदर्शन इत्यादी प्रकारच्या मूर्ती घडविल्या आहेत. इसवीसनाच्या चौथ्या शतकापासून महाराष्ट्रात नृसिंहाच्या मूर्ती तसेच मंदिरे सापडतात.
पुणे जिल्ह्य़ातील नीरा-नरसिंहपूर येथील मूर्तीचा काळ संशोधकांना अद्याप निश्चित करता आलेला नाही. महाराष्ट्रातील एकमेव सुदर्शन नृसिंह मूर्ती सातारा जिल्ह्य़ातील वाई तालुक्यात धोम येथे आहे. तसेच महाराष्ट्रात एकमेव चतुस्पाद सिंहस्वरूपी नृसिंह पुणे जिल्ह्य़ातील रांजणी येथे आहे. पादुकास्वरूपी एकमेव नृसिंह कोल्हापूर जिल्ह्य़ातील इचलकरंजी येथे आहे. अशा प्रकारे पूर्वा अष्टपुत्रेंच्या संशोधनानिमित्ताने किमान महाराष्ट्रातील सकल नृसिंह मंदिरांची सचित्र माहिती संकलित झाली असून ती ग्रंथरूपाने प्रसिद्ध होण्यासाठी त्या आता योग्य प्रकाशकाच्या शोधात आहेत. संपर्क- ०२५१/२६०५३१२, ८८०६७९६३०६.  

संशोधन व अभ्यासाचा ध्यास
लग्नानंतर अर्धवट राहिलेले शिक्षण जिद्दीने पूर्ण करणाऱ्या पूर्वा अष्टपुत्रे यांनी बदलापूर येथील नाईक विद्यालयात शिक्षिका म्हणून नोकरी केली. संसार आणि नोकरी सांभाळून संशोधनाचा घेतला वसा त्यांनी पुढेही कायम ठेवला. ‘आगरी बोली भाषा वैज्ञानिक अभ्यास  हा त्यांचा प्रबंध २०१० मध्ये मुंबई विद्यापीठात सवरेत्कृष्ट ठरला. त्यास त्या वर्षीचे अ.का.प्रियोळकर पारितोषिक मिळाले.

Who holds the keys to the ancient treasures of Tuljabhavani Devi temple
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या पुरातन खजिन्याच्या चाव्या कोणाकडे?
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!