एका खून प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ मिळावी, ही पोलिसांनी केलेली विनंती मान्य करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका आरोपीची याचिका फेटाळून लावली आहे.
हिंगणा औद्योगिक वसाहत परिसरातील एका हॉटेलमध्ये १२ मार्च २०१२ रोजी माँटी उर्फ मनजितसिंग भुल्लर याचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी १५ आरोपींना अटक केली होती. यातील एक आरोपी तक्षक मेश्राम याला घटनेच्या सहा दिवसांनी अटक करण्यात येऊन त्याच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याखाली (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास ९० दिवसांच्या मुदतीत पूर्ण न झाल्याने पोलिसांनी आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी ९० दिवसांचा वेळ मिळावा, अशी विनंती करणारा अर्ज पोलिसांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे केल्यानंतर न्यायालयाने ती मान्य करून पोलिसांना ९० दिवसांची मुदतवाढ दिली.
पोलिसांनी निर्धारित मुदतीत तपास केला नाही, तसेच मुदतवाढ देताना आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही, असे सांगून आरोपीने न्यायालयात याचिका दाखल करून न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाला आव्हान दिले. हा निर्णय रद्द ठरवून, मुदतीत आरोपपत्र दाखल न झाल्याने आपल्याला जामीन देण्याची विनंती त्याने केली होती. सत्र न्यायालयाने आरोपीला बाजू मांडण्याची संधी दिली होती, हे सहायक सरकारी वकील संजय डोईफोडे यांनी निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. मदन तहलियानी यांच्या खंडपीठाने तक्षक मेश्राम याची याचिका फेटाळून लावली.