पिंपरी-चिंचवड  नवनगर विकास प्राधिकरण व महापालिका यांच्यातील तिढा न सुटल्याने निगडी प्राधिकरणात बीओटी तत्त्वावर नाटय़गृह उभारण्याचा निर्णय रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यानंतर, उपमहापौर राजू मिसाळ यांनी पाठपुरावा केल्याने प्राधिकरणात नाटय़गृह उभारण्याच्या संकल्पेनेला मूर्त स्वरूप मिळाले आहे. आता प्राधिकरणाच्या सहकार्याने नव्हे तर महापालिकाच हे नाटय़गृह उभारणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर नाटय़गृहाच्या प्रक्रियाला सुरुवात झाली आहे.
पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचाच्या धर्तीवर प्राधिकरणात तीन ते चार हजार क्षमतेचे सभागृह उभारण्याची घोषणा राष्ट्रवादीने अनेकदा केली. मात्र, विविध अडचणींमुळे ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही. त्यानंतर, प्राधिकरणात नाटय़गृह उभारण्याचा प्रयत्न गेल्या चार वर्षांपासून होतो आहे, त्यालाही बरेच अडथळे येत आहेत. प्राधिकरण व पालिकेतील तिढय़ामुळे नाटय़गृहास मुहूर्त लागत नव्हता. बीओटी तत्त्वावर नाटय़गृह उभारण्यास प्राधिकरण प्रसासनाकडून प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर, पालिकेने स्वत:च्या पातळीवर नाटय़गृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सेक्टर क्रमांक २६ मधील दोन एकर जागा व त्यासाठी २० कोटी रुपये खर्च करून नाटय़गृह उभारण्यात येणार आहे. त्याचे ग. दि. माडगूळकर नाटय़मंदिर असे नामकरण करण्यात येणार आहे. पालिकेचा पर्यटन विकास आराखडा करणाऱ्या पी. के. दास यांनाच नाटय़गृहाचा आराखडा तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. त्यांनी केलेल्या प्राथमिक आराखडय़ात ८०० आसन क्षमतेचे सभागृह, कुटुंबासाठीची वेगळी व्यवस्था, सभागृह, कॅन्टीन, लहान मुलांच्या कार्यक्रमासाठी वेगळे दालन, आर्ट गॅलरी आदींचा समावेश आहे. पूर्णपणे तयार झालेला आराखडा अजितदादा पाहणार असून त्यांच्या संमतीनंतर अंतिम आराखडा ठरेल व त्यानुसार काम सुरू होईल, असे मिसाळ यांनी पत्रकारांना सांगितले.