खूद्द पंतप्रधान मोदींसह सारी राज्ये देशात परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढावा, यासाठी जीवाचे रान करीत असताना नागपुरातील मिहानमध्ये गुंतवणुकीसाठी आलेल्या दुबईच्या एका उद्योजकाला मात्र आपल्या ‘आंतरराष्ट्रीय विमानतळा’वर झालेल्या मनस्तापाने यालाच का भारत ऐसे नाव म्हणायचे, असे म्हणण्याची वेळ आली. व्यवस्थेतील निगरगट्टपणा किती असंवेदनशील असू शकतो, याच्या निलाजऱ्या अनुभवाने त्याला कमालीचे अस्वस्थ व्हावे लागले.

मिहान-सेझ प्रकल्पाची पाहणी करून गुंतवणूक करण्यासाठी आलेल्या दुबईच्या एका वयोवृद्ध उद्योजकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर न घेताच विमान उडाल्याने तब्बल चार तास डोके शिणवावे लागून विमानतळावरच घालवावे लागले व या उद्योजकाला अखेर मुंबई मार्गे दुबईला परतावे लागले.

दुबईचे उद्योजक केबीआर शेनॉय हे सोमवारी मिहान इंडस्ट्रिज असोसिएशनच्या विनंतीवरून मिहानच्या भेटीवर आले. या उद्योजकाचे ‘कमोडिटी मार्केट’मध्ये मोठे नाव आहे. त्यांनी मिहानमधील काही उद्योगांची पाहणीही केली. हॉटेल रेडिसनमध्ये उद्योजकांची बैठक झाली. त्यानंतर ते सायंकाळी चार सुमारास विमानतळावर पोहोचले. नागपूरहून मुंबईला जाणारे जेट विमान सायंकाळी ५.१० वाजता होते. शेनॉय यांनी ‘बोर्डिग पास’ घेतले आणि विमान निघण्याच्या घोषणेची प्रतीक्षा करीत तळमजल्यावर बसले. ते तसेच बसून राहिले अन् जेटचे विमान त्यांना न घेताच मुंबईकडे झेपावले. कळस म्हणजे,  जेटच्या कर्मचाऱ्यांनी शेनॉय यांना त्याबद्दलची सूचनासुध्दा दिली नाही. याबाबत त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली, परंतु कुणीही त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे त्यांनी नागपुरात ज्यांच्या विनंतीवरून आले त्यांना दूरध्वनी केला.

मिहान इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मनोहर भोजवानी यांनी तातडीने विमानतळ गाठले. तत्पूर्वी, भ्रमणध्वनीवरून जेटच्या कर्मचाऱ्यांकडे याकडे विचारणा केली, परंतु त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही आणि कार्यालयाची वेळ झाल्याचे सांगून ते निघूनही गेले. शेवटी, शेनॉय यांनी रात्री ८.४५ वाजता उडणारे इंडिगो विमानाचे तिकीट काढण्याचे ठरवले, परंतु त्यांचे क्रेडिट कार्ड अवैध असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे ६५ वर्षीय उद्योजक आणखीच गोंधळले. त्यांनी त्यांच्याकडील दुसरे क्रेडिट कार्ड दिले अन् इंडिगोचे तिकीट बुक केले. त्यानंतर थोडय़ाच्या वेळात त्यांना कळले की, त्यांच्या दोन्ही क्रेडिट कार्डमधून विमानाच्या तिकिटासाठी रक्कम काढली गेलेली आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या या अनुभवाने एक मोठे गुंतणूकदार पार हादरून गेले. अखेर ते इंडिगो विमानाने पावणे नऊ वाजता मुंबईला आणि तेथून दुबईला रवाना झाले.

देशाची प्रतिमा मलीन होते

मिहान भेटीवर आलेल्या दुबईच्या एका गुंतवणूकदाराला जेट एअरवेज आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या बेजबाबदार आणि निष्काळजीपणामुळे हकनाक त्रास सहन करावा लागला. नागपूरहून मुंबईकडे जाणारे विमान उडाले, पण उद्घोषणा न झाल्याने ते विमानतळावरच बसून राहिले. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी सहकार्य देखील केले नाही. अशाप्रकारे एका गुंतणूकदाराला आंतराष्ट्रीय विमानतळावर असा अनुभव यावा यातून देशाची प्रतिमा मलिन होते, असे मिहान इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मनोहर भोजवाणी म्हणाले.

Story img Loader