उरण तालुक्यातील पर्यावरणाचे रक्षण करून तालुका हिरवेगार करण्यासाठी उरण तहसील कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी उरणमधील कंटेनर, गोदाम व्यवस्थापक व प्रकल्पाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी घेण्यात आली. या बैठकीत गोदाम व प्रकल्पाच्या जागेच्या ३३ टक्के वृक्षलागवड करून त्याचा अहवाल तहसील कार्यालयाला सादर करा, असे आदेश उरणच्या तहसीलदारांकडून देण्यात आले.
उरण तालुका हा हिरवीगार भातशेती, नारळाची, आंब्याची झाडे आदींनी बहरलेले टुमदार गाव होते, जेएनपीटी बंदर  आले आणि तालुक्यात रस्तेच रस्ते आणि बंदरावर आधारित उद्योग व त्यातून भले मोठे मालवाहू कंटेनरचे यार्डाची सुरुवात झाली. तालुकाच्या विकास झाला, मात्र नैसर्गिकदृष्टय़ा तालुका भकास होऊ लागला आहे.याची नोंद घेऊन उरण सामाजिक संस्थांकडून उरणच्या तहसीलदारांकडे तालुक्यातील औद्योगिक विभागांकडून वृक्षारोपण करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार तालुक्यातील कंटेनर यार्डच्या मालकांना बोलावून तहसीलदारांनी ११ ऑगस्ट २०१४ ला बैठक घेतली होती. या वेळी कंटेनर यार्डातील प्रत्येक गुंठय़ामागे एका तरी वृक्षाची लागवड करून त्याची सुरुवात स्वातंत्र्य दिनापासून करावी, अशी सूचना करण्यात आली होती. वर्ष लोटल्यानंतरही त्याची अंमलबजावणी न झाल्याने सोमवारी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करावी व आपल्या जागेच्या ३३ टक्के वृक्षलागवड करण्याचे आदेशच उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांनी या वेळी दिले.