जिल्हा परिषदेतील पदाधिका-यांचा वचक नसल्याने अधिकारी नियमांची पायमल्ली करत कामकाजात मस्तवालपणा करत आहेत. येत्या आठवडाभरात त्यात सुधारणा न झाल्यास वेळप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिका-यांविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याचा इशारा राष्ट्रवादीचे सदस्य सुजित झावरे व संभाजी दहातोंडे तसेच भाजपचे सदस्य प्रवीण घुले यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. सीईओंच्या विरोधात आपण उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचेही झावरे यांनी सांगितले.
जि.प.ची सर्वसाधारण सभा तसेच स्थायी समितीत अनेक निर्णय, ठराव होऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे या तिघा सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. याच कारणातून तसेच सदस्यांची कामे डावलली जात असल्याचा आरोप करत आज होणारी शिक्षण समितीची सभा तहकूब करण्यात आल्याची माहिती घुले व दहातोंडे यांनी दिली. आपल्या या भूमिकेस बहुसंख्य सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावाही तिघांनी केला.
आपण यासंदर्भात सहा महिन्यांपूर्वीच तक्रार केली होती, मात्र पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्यालाच शिस्तभंगाची नोटीस काढली व माझी तक्रार दडपण्याचा प्रयत्न केला, आता बहुसंख्य सदस्यांना जिल्हाध्यक्ष नोटीस काढणार का, असा प्रश्न दहातोंडे यांनी केला. गेल्या सर्वसाधारण सभेत संगमनेर व कोपरगाव पालिकेतून वर्ग केलेल्या प्राथमिक शिक्षकांना नियुक्ती देण्याचा निर्णय स्थगित ठेवण्याचा ठराव झाला.

आंतरजिल्हा बदली करताना आमदार विजय औटी यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यामुळे प्राधान्यक्रम डावलून एकाची नियमबाहय़पणे नियुक्ती करण्यात आली, ती रद्द करण्याचा निर्णय झाला, त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही, निलंबित कर्मचाऱ्यास पुन्हा त्याच तालुक्यात नियुक्ती न देण्याचा नियम असतानाही दिले जाते, निलंबित अपंग शिक्षकांना पुन्हा नियुक्ती देताना बेकायदा सोडत काढण्यात आली, त्यातही अनेक चुका करण्यात आल्या, पारनेरमधील टँकर गैरव्यवहार प्रकरणात गुन्हे दाखल न करणे, अनेक परिपत्रके व आदेशांचा सोयीनुसार अर्थ लावून मनमानी पद्धतीने निर्णय अधिकारी घेत आहेत, पदाधिकारी किंवा सदस्यांनी कामे सुचवली तर त्याकडे दुर्लक्ष केले जाते, ही कार्यपद्धती जि.प.च्या परंपरेला काळिमा फासणारी आहे, अशा संस्थेत काम करणे लाज वाटणारे व अवमानकारक आहे, असे झावरे म्हणाले.