चेंबूर पोलिसांनी एका अट्टल घरफोडय़ास फिल्मी स्टाइलने पाठलाग करून अटक केली. गणेश शिंदे (३१) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. पाठलागानंतर चोराशी झालेल्या झटापटीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला.
 चेंबूर पूर्वेच्या शेल कॉलनी येथे एका मौलवीच्या घरात चोरी झाली होती. अज्ञात चोराने घरफोडी करून घरातील मौल्यवान दागिने लंपास केले होते. या प्रकरणात कुख्यात घरफोडी करणाऱ्या गणेश शिंदे याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याला मुंबईतून तडीपार करण्यात आले होते. परंतु त्या काळातही त्याने येऊन ही चोरी केली होती. शिंदे मानखुर्द येथील साठे नगरात आल्याची माहिती चेंबूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर देवडे यांना मिळाली. सहाय्यक पोलीस निरीत्रक कोकरे आणि त्यांचे सहकारी त्वरित शिंदेला पकडण्यासाठी गेले.
पोलिसांना पाहून शिंदेने पळ काढला. पण काही वेळाच्या नाटय़मय पाठलागानंतर कोकरे यांनी शिंदेला पकडण्यात यश मिळवले. या पाठलाग आणि झटापटीत एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला होता. अन्य पोलीस ठाण्याच्या हद्दीतही त्याने गुन्हे केल्याने त्याला पुढील तपासासाठी संबंधित ठिकाणी हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे देवडे यांनी सांगितले.