भ्रष्ट, अकार्यक्षम, व्यसनी आणि लफडेबाज पोलिसांना दूर ठेवण्यासाठी त्यांची काळी यादी बनवली जाणार आहे. पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी बुधवारी ही माहिती दिली. या काळ्या यादीतील पोलिसांना सर्वसामान्य लोकांपासून दूर शस्त्रास्त्र विभागात बदली केली जाणार आहे. याशिवाय लोकांशी कसे वागावे याचे प्रशिक्षण पोलिसांना देण्यास सुरवात केली आहे.
 अंधेरीत एका मॉडेलला साकिनाका पोलीस ठाण्याच्या तीन पोलिसांनी बेकायदेशीरपणे डांबून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून लुटले होते. त्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आयुक्तांनी अशा कलंकित पोलिसांनी शोधून त्यांची काळी यादी बनविण्याचा निर्णय घेतला आहे. गुन्हे शाखा आणि विशेष शाखेला ही काळी यादी बनविण्याचे काम देण्यात आले आहे. कुणी भ्रष्टाचारी असेल, मद्यपी असेल, बाहेरख्याली असेल अशा वर्गवारीनुसार ही यादी केली जाणार आहे. मे अखेपर्यंत ही यादी पूर्ण केली जाणार आहे. या पोलिसांना सर्वसामान्य लोकांशी संपर्क येणार नाही अशा विभागात म्हणजे शस्त्रास्त्र विभागात बदली केली जाणार आहे, अशी माहिती मारिया यांनी दिली. प्रथमच अशा प्रकारची यादी बनवली जात असून दर वर्षी ही यादी बनवली जाणार आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या विभागात बारकाईने लक्ष ठेवण्याची ताकीदही त्यांना देण्यात आलेली आहे. वाहतूक विभागाला शिस्त लागावी यासाठीही आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दीड महिन्यांपूर्वी एक बैठक घेऊन त्यांनी वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. केवळ वाहतूक संबंधी गुन्हे दाखल केले ही चांगली कारवाई नसून वाहतूक सुरळीत होणे महत्त्वाचे आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याच्या सूचना दिल्या. महिनाभराच्या कामगिरीचा आढावा घेतल्यानंतरच कामचुकार आणि भ्रष्ट अशा ३५ वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वडाळ्यात चार वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्यानंतर हद्दीच्या वादाने ती मुलगी अडीच तास उपचाराविना राहिली होती. यामुळे पोलीस ठाण्यातील स्टेशन हाऊसमधील कर्मचाऱ्यांना लोकांशी कसे वागावे त्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्टेशन हाऊसमध्ये काम करणाऱ्या पोलिसांना तज्ज्ञ तसेच माजी पोलीस अधिकाऱ्यांकडून हे प्रशिणक्ष दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवसांचे हे प्रशिक्षणाचे सत्र आहे. त्यात कायद्याची माहिती, लोकांशी विशेषत: महिलांशी कसे वागावे याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.