सोलापूर जिल्हय़ात डोके वर काढलेल्या वाळूतस्करी विरुद्ध एकीकडे जिल्हा प्रशासनाने व्यापक कारवाई चालविली असतानाच एका उपजिल्हाधिका-याच्या वाहनचालकाकडून होणारी वाळूतस्करी उघडकीस आली. दक्षिण सोलापूरच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी घातलेल्या एका धाडीत वाळूतस्करीसाठी वापरली जाणारी मालमोटार उपजिल्हाधिकाऱ्याच्या वाहनचालकाच्या कुटुंबीयांची असल्याचे दिसून आले. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजयानंद पांडुरंग घाडगे (वय ४४, रा. सिटीझन पार्क, नवीन आरटीओजवळ विजापूर रोड, सोलापूर) असे त्याचे नाव आहे. मालमोटारचालक राजकुमार गायकवाड याच्यासह घाडगे यास अटक करण्यात आली आहे. घाडगे हा उपजिल्हाधिकारी शहाजी गायकवाड यांच्या वाहनावर चालक म्हणून नेमणुकीस आहे. तो महसूल विभाग वाहनचालक संघटनेचा अध्यक्षही आहे. त्याच्या पत्नीच्या नावावर मालमोटार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी जोडभावी पेठेतील चाटला चौकात धाड घालून अवैध वाळू वाहतुकीची मालमोटार पकडली. याबाबत चौकशी केली असता मालमोटारचालक गायकवाड यांनी उडवाउडवीची उत्तरे देत मालकाचे नाव पुढे केले. त्यातून विजयानंद घाडगे याचे नाव पुढे आले. याचवेळी घाडगे याने प्रवीण निकाळजे, राजू गायकवाड, वजीर दौलताबादकर यांच्या मदतीने गोंधळ घालून शहाजहूर रजाक शेख (वय २८, रा. होटगी, ता. दक्षिण सोलापूर) यास, तूच आमची वाळूची मालमोटार पकडून देण्यास मदत केली, म्हणून बेदम मारहाण केली. याबाबत तहसीलदार शिल्पा ठोकडे तसेच जखमी शहाजहूर शेख यांनी घाडगे व त्याच्या साथीदारांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात स्वतंत्रपणे फिर्याद नोंदविली आहे. पोलिसांनी घाडगे व गायकवाड यांना अटक केली असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.