पनवेलमधील करंजाडे नोड येथे गुंडांचे राज्य नसून लोकशाहीचे राज्य असल्याचे सांगत नवी मुंबई पोलीस प्रशासनाने बांधकाम व्यावसायिकांना आश्वस्त केले आहे. पनवेलमधील करंजाडे येथील वीज कंत्राटदार किशोर बाबरे यांच्यावर मंगळवारी झालेल्या हल्ल्यानंतर बांधकाम व्यावसायिकांनी पोलिसांचे दार ठोठावले. या बांधकाम व्यावसायिकांनी शुक्रवारी साहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या. त्यावेळी झालेल्या बैठकीत पोलीस अधिकारी सूर्यवंशी यांनी या बांधकाम व्यावसायिकांना सुरक्षेचे आश्वासन दिले. इमारतीचे बांधकाम करताना चांगल्या दर्जाचे साहित्य वापरा, असे आवाहन पोलिसांनी उपस्थित विकासकांना केले तसेच गुंडगिरी रोखण्यासाठी पोलिसांकडे तक्रारी नोंदविण्याची सूचनाही केली.
पनवेल तालुक्यातील सिडको नोडमध्ये तळोजा, नावडे व करंजाडे येथे बांधकामासाठी लागणारे साहित्य (रेती, विटा व पाणी) यांच्या पुरवठय़ाच्या ठेक्यासह वीज मीटरचे कंत्राट स्थानिकांच्या मर्जीतील कंत्राटदाराला मिळावे, असा दबाव स्थानिकांकडून केला जातो. या हट्टासाठी राजकीय पक्षांचा आधार घेण्यात येतो. मात्र या जीवघेण्या स्पर्धेमुळे संबंधित आम्ही भीतीच्या सावटाखाली व्यावसाय करीत असल्याचे या बैठकीत अनेक विकासकांनी पोलिसांना सांगितले. किंबहुना स्थानिक कराच्या नावाखाली ही पिळवणूक होत असून त्यामुळे बांधकामात स्थानिकांनी पुरविलेल्या रेतीच्या बदल्यात खाडीची माती वापरावी लागते, अशी कबुलीही अनेक विकासकांनी दिली. या बांधकाम साहित्याच्या पुरवठा व्यवसायात काही गुंडांचा सहभाग असल्याने अनेक विकासकांनी त्यांच्यापुढे गुडघे टेकल्याचे वास्तव या बैठकीत समोर आले. धमकी व हल्ले करणाऱ्यांवर आम्ही नक्कीच सक्त कारवाई करू, मात्र त्यासाठी संबंधित तक्रारदारांनी पोलिसांत तक्रार देणे आणि संबंधित पुरावे देऊन त्या भूमिकेवर शेवटपर्यंत ठाम राहणे गरजेचे असल्याचे पोलीस अधिकारी सूर्यवंशी म्हणाले. या बैठकीत उपस्थित असलेल्या विकासकांची नावे प्रसिद्ध करू नयेत, असे आवाहनही पोलिसांनी केले.
किशोर बाबरे या वीज कंत्राटदारावर झालेल्या हल्याचे कारण कंत्राटाचा ठेका नसल्याचा दावा सूर्यवंशी यांनी यावेळी केला. या प्रकरणातील आणखी काही संशयितांना अटक केल्यावर यामागचे मूळ कारण स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले. तसेच करंजाडे नोडमध्ये बांधकाम व्यावसायिकांना धमकावून ठेके मिळविणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई सुरू असल्याचेही सांगण्यात आले.