ठाणे शहरातील तीनहात नाका, नितीन आणि कॅडबरी जंक्शन या मुख्य चौकांत होणारी वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने आखलेल्या बदलांविषयी ठाणे वाहतूक शाखेतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा एक मोठा गट संभ्रमावस्थेत असून सेवा रस्ते बंद केल्याने वळसा घेणाऱ्या मार्गावर कोंडीचे नवे दुखणे तर उभे राहणार नाही ना, अशी भीती या गोटातून व्यक्त होऊ लागली आहे.
या होऊ घातलेल्या बदलांमध्ये सेवा रस्ते (सव्‍‌र्हिस रोड) बंद करण्यात येणार असल्यामुळे नागरिकांना मोठा वळसा घालून घर गाठावे लागणार आहे. तसेच सेवा रस्त्यांवरील वाहनांना एलबीएस मार्गावरून यू टर्न घेऊन जावे लागणार आहे. शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेवरही या सगळ्याचा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. एकंदरीत या नव्या वाहतूक बदलानुसार ठाणेकरांचा प्रवास अधिकच कटकटीचा होण्याचे संकेत मिळत असल्यामुळे या बदलास नागरिकांचा विरोध होण्याची चिन्हे आहेत.
ठाणे शहर तसेच नवीन ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर भागात गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर गृहसंकुले उभी राहिली आहेत. त्यामुळे या वाढत्या लोकसंख्येच्या बरोबरीनेच शहरातील वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. असे असताना शहरातील बहुतेक रस्ते अरुंद असल्याने त्यांच्या रुंदीकरणास फारसा वाव राहिलेला नाही. त्यामुळे वाहनांच्या तुलनेत शहरातील रस्ते अपुरे पडू लागले आहेत. ठाणे महापालिकेने मुंबई-नाशिक महामार्गाला छेदणाऱ्या शहरातील तीनहात नाका, नितीन आणि कॅडबरी जंक्शन या तिन्ही मुख्य चौकातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी येथील वाहतुकीत मोठे बदल करण्याचा विचार सुरू केला आहे. त्यासाठी जुलै महिन्याच्या अखेरीस सात दिवसांच्या प्रायोगिक तत्त्वावर तीनहात नाका येथे हा बदलाचा प्रयोग राबविण्यात येणार आहे.
बदलांविषयी आतापासूनच संभ्रम
या होऊ घातलेल्या बदलांमध्ये सेवा रस्ते तीनहात नाका चौकातून जाणाऱ्या वाहनांसाठी बंद करण्यात येणार असल्यामुळे पाचपाखाडी तसेच लुईसवाडी भागातील नागरिकांना नितीन जंक्शन येथून लांब वळसा घालून जावे लागणार आहे. त्यामुळे पाचपाखाडी तसेच लुईसवाडी भागातील नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. तीनहात नाका चौकात येण्यासाठी सेवा रस्ते वाहतुकीसाठी खुले ठेवण्यात येणार असले तरी, या वाहनांना एलबीएस मार्गावर येऊन यू टर्न घेऊन जावे लागणार आहे. यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ शकते. तसेच वागळे भागातून येणारी वाहने रहेजा आणि मॉडेला मार्गे तीनहात नाका चौकात यावे लागणार आहे. त्यामुळे वागळे भागातून येणारी वाहने आणि ज्ञानसाधना सेवा रस्ते मार्गे एलबीएस मार्गावर वळसा घालण्यासाठी येणारी वाहने अशा दोन्ही बाजूंकडील वाहनांमुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ शकते. परिणामी, त्याचा शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम दिसू शकतो, असे वाहतूक तज्ज्ञाचे मत आहे. तीनहात नाका येथील मुख्य चौकातील वाहतुकीचे सर्वेक्षण खासगी कंपनीने केले असून या वाहतुकीचा आढावा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार या चौकात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या वाहतूक बदलासाठी सविस्तर अभ्यास सुरू असून हा प्रयोग यशस्वी कसा होईल, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महापालिका तसेच वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.  
महापालिकेचा आग्रह का?
तीनहात नाका येथील मुख्य चौकात राबविण्यात येणाऱ्या सात दिवसांच्या प्रायोगिक बदलामुळे सातऐवजी पाच सिग्नल सुरू राहणार आहेत. सद्यस्थितीत या चौकात १९० सेंकदांचा सिग्नल कार्यरत असून एक सिग्नल साधारण ३० ते ३५ सेंकदांचा आहे. या नव्या वाहतूक बदलामुळे दोन सिग्नल कमी होणार असले तरी, त्यांचा वेळ कमी होणार नाही. या उलट हा सिग्नल १९० सेंकदांचा ठेवण्यात येणार असल्यामुळे प्रत्येक सिग्नलच्या वेळेत काही सेंकदांनी वाढ होऊ शकते. तसेच सेवा रस्ते जाणाऱ्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्यामुळे पाचपाखाडी तसेच लुईसवाडी भागातील नागरिकांना वळसा घालून जावे लागणार आहे. त्यामुळे इंधनाच्या खर्चात वाढ होऊ शकते. एकंदरीतच या नव्या बदलामुळे सिग्नलचा वेळ कमी होणार नाही आणि नागरिकांच्या इंधनाचा खर्च वाढू शकतो. असे असतानाही महापालिका या प्रयोगासाठी आग्रही का आहे, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. यासंबंधी वाहतूक पोलीस दलातील अधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आमचाही अभ्यास सुरू आहे, अशी प्रतिक्रिया काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.