तरुणाईत व्यसनाधीनतचे वाढते प्रमाण पाहता विद्यार्थिदशेपासून पुढील पिढीमध्ये जनजागृती करून त्यांना व्यसनापासून दूर करत सक्षम नागरिक घडविण्यासाठी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रसेन देशमुख यांनी सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. शाळा आणि पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी जनजागृती उपक्रम त्यांनी राबविण्यास सुरुवात केली असून त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
मालिका, चित्रपट आदींच्या माध्यमांतून मद्यपान, धूम्रपान आदींचे सर्रास चित्र पाहायला मिळते. तसेच आजूबाजूच्या मोठय़ा व्यक्तींकडून होणारे या प्रकारांचे अनुकरण लहान मुलांकडून केले जाते. झोपडपट्टी परिसरात याचे प्रमाण अधिक आहे. तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या भागात मोठय़ा प्रमाणात झोपडपट्टी आहे. या ठिकाणी नागरिकांमध्ये व्यसनाचे प्रमाण अधिक असल्याने येथील लहान मुले आणि तरुणदेखील व्यसनाकडे वळत आहेत. या तरुणांमध्ये आणि लहान मुलांमध्ये जनजागृती करून त्यांना व्यसनापासून  रोखण्यासाठी देशमुख यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मंगळवारी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती विषयावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांशी स्वयंसेवकांनी व्यक्तिगत सुसंवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या वेळी शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच  चित्रफितीच्या माध्यमातून व्यसनाच्या दुष्परिणामांची माहितीदेखील देण्यात आली. बुधवारी तुर्भे येथील नवजीवन परिसरातदेखील हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा आणि तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच या उपक्रमाचे नागरिकांकडूनदेखील कौतुक करण्यात येत आहे.