महाराष्ट्र दिनी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील तीन अधिकारी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक तसेच शहर पोलीस दलातील दोन अधिकारी व तीन कर्मचारी अशा नागपुरातील एकूण नऊ जणांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्माचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात राखीव उपनिरीक्षक म्हणून सेवारत असलेल्या डिंपल नायडू यांना पोलीस महासंचालकांचे सन्माचिन्ह प्राप्त झाले आहे. त्यांनी देश-विदेशातील क्रॉस कंट्रीत उत्कृष्ट कामगिरी करून अनेक पदके प्राप्त केली आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी बजावल्याबद्दल त्यांना तीन वेळा ‘आऊट ऑफ टर्न प्रमोशन’ मिळाले आहे. प्रशिक्षण केंद्रातील उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश गांगुलवार व अविनाश बोंद्रे यांनाही सन्मानचिन्ह प्राप्त झाले आहे. बोंद्रे यांनी खलिस्तानी दहशतवादी पिंका याचा पाकिस्तानच्या सीमेपर्यंत पाठलाग केला होता. जरीपटक्याचे ठाणेदार बाळकृष्ण हनपुडे यांनाही सन्मानित करण्यात आले. ते १९९१ मध्ये पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. वर्धा जिल्ह्य़ातील आष्टी येथे कार्यरत असताना वर्धा नदीला महापूर आला असता त्यांनी नदीच्या काठावर असलेल्या अनेकांचे जीव वाचवले होते. औरंगाबादला असताना दरोडेखोरांची आंतरराज्यीय टोळी पकडून २२ घरफोडय़ा उघडकीस आणल्या होत्या. अशाप्रकारच्या अनेक कामगिरी त्यांनी बजावल्या आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस निरीक्षक अशोक देवतळे यांनाही महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्राप्त झाले. गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देऊन राज्यपाल के. शंकरनारायण यांच्या हस्ते गौरवण्यात आले होते. त्यांना आतापर्यंत ६८० पुरस्कार व ३५ प्रशस्तीपत्रे प्राप्त झाली आहेत. याशिवाय पोलीस उपनिरीक्षक भास्कर वानखेडे, नायक सुरेश पवार, हवालदार सुरेश शिंगोटे यांनाही महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.