शहरातील वेगवेगळ्या भागांत झालेल्या तीन घरफोडय़ांच्या घटनांमध्ये सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. पोलीस दलातील महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या आहेत. काही नवीन अधिकाऱ्यांनी सूत्रे स्वीकारून अवघे काही दिवस झाले आहेत, तर काही अधिकाऱ्यांना अद्याप सूत्रे हाती घ्यावयाची आहेत. या पाश्र्वभूमीवर, चोरटय़ांनी पुन्हा आपले रंग दाखविण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे.
गंगापूर रस्त्यावरील सिरीन मेडोज् येथे सुनील मेहता यांच्या यतिश बंगल्यात सायंकाळी चोरटय़ांनी हात साफ केला. बंगल्याला टाळे असल्याचे पाहून किचनची खिडकी तोडून चोरटय़ांनी आतमध्ये प्रवेश केला. लोखंडी कपाटातील एक लाख रुपयांची रोकड आणि सुमारे २९ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने त्यांनी लांबविले. मेहता घरी परतल्यावर हा प्रकार निदर्शनास आला. चोरटय़ांनी एक लाख २८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार त्यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. घरफोडीची दुसरी घटना मखमलाबादच्या रामकृष्णनगरमधील परमहंस बंगल्यात घडली. या प्रकरणी सहदेव जामदार यांनी तक्रार दिली. घरात कोणी नसताना चोरटय़ांनी किचनची खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश केला. लोखंडी कपाटातील रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असा ४२ हजार २०० रुपयांची रोकड व दागिने चोरटय़ांनी हस्तगत केले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरफोडीचा तिसरा प्रकार आडगाव शिवारातील जुन्या नांदुर रस्त्यावरील ओम निवास बंगल्यात घडली. घरातील सदस्य बाहेर गेले असताना चोरटय़ांनी हा डाव साधला. दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरटय़ांनी आतमध्ये प्रवेश केला. कपाटातून सोन्याचे मंगळसूत्र व रोख रक्कम असा १९ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी जितेंद्र निकत यांनी दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसांत घडलेल्या या घटनाक्रमामुळे चोरटय़ांनी पुन्हा आपले डोके वर काढल्याचे स्पष्ट झाले आहे. बंद घरांकडे मोर्चा वळविताना चोरटय़ांनी सकाळी ते रात्री नऊ या कालावधीत उपरोक्त घटनांना मूर्त स्वरूप दिल्याचे लक्षात येते. शहरातील कोम्बिंग ऑपरेशन, प्रमुख रस्त्यांवर वाहनधारकांची केली जाणारी तपासणी, कॉलनी व रहिवासी क्षेत्रात घातली जाणारी गस्त काहीशी थंडावल्यामुळे चोरटे आपले रंग दाखविण्यात यशस्वी होऊ लागल्याची सर्वसामान्यांची भावना आहे.
जेलरोड परिसरात मंगळसूत्र खेचले
महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेण्याचे प्रकारही अव्याहतपणे सुरू आहेत. नाशिकरोडच्या शिवाजीनगर भागात गुरुवारी रात्री पावणेआठच्या सुमारास पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ४५ हजार रुपयांचे मंगळसूत्र पल्सरवरून आलेल्या तीन चोरटय़ांनी लांबविले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.