विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलिसांनी संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रे जाहीर करण्यासाठी स्थानिक पातळीवर चाचपणी सुरू केली आहे. यासाठी मतदारसंघाची पाश्र्वभूमी तसेच मागील निवडणुकीची सविस्तर माहिती गोळा करण्यात येत आहे. मागील दोन आठवडय़ांपासून सुरू असलेल्या या सव्‍‌र्हेक्षणात बोगस मतदान, जास्त मतदान, कमी मतदान, गोंधळ, हाणामारी, गर्दी जमविणे अशा प्रकारांची इत्थंभूत माहिती गोळा केली जात आहे. त्याआधारे तहसीलदार आणि स्थानिक पोलीस संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदार केंद्रांची यादी तयार करीत असून ती येत्या आठवडय़ाभरात जाहीर करण्यात येणार आहे.
मतदान केंद्रावर दहशतीचे वातावरण नसावे आणि मतदारांना निर्भीडपणे मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रे जाहीर करण्याच्या सूचना देण्यात येतात. तसेच पाच निकषाच्या आधारे अशी मतदान केंद्रे जाहीर करण्याचे निर्देश देण्यात येतात. त्याआधारे प्रत्येक  निवडणुकांमध्ये पोलीस यंत्रणेमार्फत संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची यादी जाहीर करण्यात येते. अशा प्रकारे मतदान केंद्राची वर्गवारी करण्यात येत असल्यामुळे मतदान केंद्रावर नेमका किती फौजफाटा तैनात करायचा, याचा अंदाज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना येत असतो. तसेच यापूर्वीच्या निवडणुकांमधील या केंद्रांचा पूर्व इतिहास माहिती असल्यामुळे मतदानाच्या दिवशी अनुचित प्रकार रोखणे पोलिसांना शक्य होते. त्यामुळे यंदा निवडणूक आचारसंहिता लागण्याआधीपासूनच स्थानिक पोलिसांमार्फत सव्‍‌र्हेक्षण सुरू केले आहे.
गेल्या दोन आठवडय़ांपासून ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरातील विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांचे सव्‍‌र्हेक्षण सुरू आहे. हे सव्‍‌र्हेक्षण अंतिम टप्प्यात असून त्याआधारे येत्या आठवडय़ात संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची यादी जाहीर करण्याची तयारी पोलिसांकडून सुरू आहे, अशी माहिती ठाणे पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

बंदोबस्ताची रणनीती
मागील निवडणुकांमध्ये मतदान केंद्रांवर झालेले जास्त मतदान, कमी मतदान, बोगस मतदान, गर्दी जमविणे, गोंधळ आणि हाणामारी, या सर्वाचा अंदाज स्थानिक पोलिसांकडून घेण्यात येत असून त्याआधारे संवेदनशील आणि अतिसंवेदशील मतदान केंद्रे घोषित करण्यात येणार आहेत. तसेच मतदारांना निर्भीडपणे मतदान करता यावे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अशा मतदान केंद्रावर कशा प्रकारे पोलीस बंदोबस्त तैनात करायचा, याची रणनीतीही ठाणे पोलिसांकडून आखली जात आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.