पोलिओ रोगाचे निर्मूलन करण्यासाठी विदर्भातील विविध जिल्ह्य़ात पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. पहिल्या दिवशी विदर्भात ७ लाखाच्यावर बालकांना पोलिओ लस देण्यात आली आहे. महापालिकेतर्फे सदर रोगनिदान केंद्रात उपमहापौर जैतुन्नबी अंसारी यांनी बालकाला पोलिओ डोज देऊन मोहिमेचा शुभारंभ केला.
कार्यक्रमाला महापालिका आयुक्त श्याम वर्धने, अप्पर आयुक्त हेमंत पवार यांच्यासह नगरसेवक आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शहरात एकही बालक पोलिओ डोजपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेत आरोग्य विभागाने काम करावे असे आवाहन वर्धने यांनी केले.
शहरात १ हजार १७५ बुथ तयार करण्यात आले असून त्यावर ३ हजार २७५ कर्मचारी कार्यरत होते. शहरातील मस्जिद, मॉल्स, बिग बाझार, रेल्वेस्थानक, बसस्थानक, विमानतळ, नाका, मोबाईल टीमद्वारे शहरातील विविध भागात बालकांना पोलिओ डोज देण्यात आले. अंगणवाडी सेविका संपावर असल्याने महापालिकेने आरोग्य विभागासह विविध विभागातील कर्मचाऱ्यांना या कामासाठी लावले होते. त्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते.
सदरमध्ये झालेल्या कार्यक्रमाला डॉ. संजय मेश्राम, डॉ. रुधवानी, डॉ. शिल्पा जिचकार, पोलिओचे कार्यक्रम अधिकारी डॉ. श्याम शेंडे, डॉ. सविता मेश्राम, डॉ. साजीद खान, डॉ. अनिता चिव्हाणे, डॉ. प्रदीप दास, डॉ. जोशी, सहा. आयुक्तच प्रकाश वराडे यांच्यासह स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पल्स पोलिओ मोहिमेचा दुसरा टप्पा २३ फेब्रुवारीला होणार आहे. त्यासाठी देखील सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले.