डोंबिवली शहरातील रेल्वे स्थानक परिसर आणि मुख्य रस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून पालिकेची परवानगी न घेता अनेक राजकीय नेते, उठवळ कार्यकर्त्यांनी वाढदिवस, शुभेच्छा देणारे, स्वत:ची प्रतिमा सुधारणारे फलक लावून शहराचे विद्रुपीकरण केले आहे. या विद्रुपीकरणाविषयी काही नागरिकांनी पालिकेत तक्रारी केल्या आहेत. पालिकेच्या डोंबिवलीतील प्रभाग अधिकाऱ्यांकडून त्याची दखल घेण्यात येत नसल्याचे तक्रारदारांकडून बोलले जाते.
डोंबिवली पूर्व आणि पश्चिम रेल्वे स्थानक भागातील चौक, मुख्य रस्त्यांवर अनेक राजकीय नेते, उठवळ पुढाऱ्यांनी फलक लावले आहेत. शहरात येणारा प्रत्येक नागरिक या फलकांकडे, त्यामधील चेहरे आणि लिखाणाकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही.  
या फलकांचे ‘दर्शन’ घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. शहरात प्रवेश करताना मुख्य रस्ते, चौकांच्या नावांचे फलक लावण्याऐवजी ही राजकीय मंडळी स्वत:ची टिमकी वाजवून शहर विद्रूप करीत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. काही जणांनी शुभेच्छांबरोबर आपली प्रतिमा सुधारण्यासाठी शहरात प्रतिमा सुधारण्याचे फलक लावले आहेत.
या विषयावर शहरात खमंग चर्चा सुरू आहे. एका महिला नगरसेविकेच्या तक्रारीवर झालेल्या निर्णयाला प्रत्युत्तर देण्यासाठी काही राजकीय मंडळींकडून शहरातील मुख्य रस्ते, चौकांचा आधार घेण्यात येत असल्याने नागरिकांनी शहरात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असे प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलीस, पालिका अधिकाऱ्यांच्या मौनाविषयी नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
सुशिक्षित, सुसंस्कृत म्हणून डोंबिवलीचे राजकीय नेत्यांनी गोडवे गायचे आणि त्याच नेत्यांनी शहराचे विद्रुपीकरण करून शहरावर ‘डाग’ लावायचा या विषयी नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. या फलकबाजीवर प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे. गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नको म्हणून आम्ही शांततेची भूमिका घेतली. मात्र उद्यापासून शहरातील सर्व नियमबाह्य़ फलक काढण्यात येतील, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.