सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे धार्मिक संस्था असल्याने त्या व्यासपीठांवरून राजकीय प्रचार करण्यास ठाणे पोलिसांनी मज्जाव केलेला असूनही ठाणे तसेच आसपासच्या शहरातील गणेशोत्सवात राजकीय नेत्यांची छायाचित्रे आणि पक्षांच्या नावाचे फलक जागोजागी झळकताना दिसून येत आहेत. अशा प्रकारची जाहिरातबाजी करणाऱ्या मंडळांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी एका नोटीसद्वारे दिला होता. मात्र, दहीहंडी उत्सवाप्रमाणेच गणेशोत्सव मंडळांनी ठाणे पोलिसांच्या या नोटीसला पुन्हा एकदा केराची टोपली दाखविल्याचे चित्र दिसून येत आहे.
गणेशोत्सव मंडळांना राजकीय जाहिरातबाजीतून मोठी ‘गंगाजळी’ तर नेत्यांना प्रसिद्धी मिळते. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांच्या प्रतिमा असलेले फलक जागोजागी झळकताना दिसून येतात. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून राजकीय नेते आणि मंडळाचे नवे समीकरण जुळून आले आहे. आपली राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचे व्यासपीठ म्हणून अनेक कार्यकर्ते त्याचा उपयोग करतात. तसेच विभागातील मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठीही अशा उत्सवांच्या व्यासपीठांचा वापर होताना दिसून येतो. यंदा मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे धार्मिक संस्था असल्याचे स्मरण करून देत पोलिसांनी त्या व्यासपीठावरून राजकीय पक्षांच्या नावाचा वापर आणि पक्षाचा प्रचार करण्यास मज्जाव केला आहे. त्यासाठी धार्मिक स्थळांचा (गैरवापर प्रतिबंध) अधिनियम १९८८ या कायद्याचा आधार घेतला असून त्यासंबंधी गणेशोत्सव मंडळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.या नोटीसचे उल्लंघन केल्यास आणि धार्मिक स्थळांचा गैरवापर झाल्याचे आढळल्यास संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. असे असतानाही गणेशोत्सव मंडळांनी ठाणे पोलिसांना वाकुल्या दाखवत राजकीय पक्षांचे आणि नेत्यांची छायाचित्रे असलेले फलक जागोजागी लावले आहेत.
राजकीय पाठबळामुळे मंडळे वाढली ?
समाज एकत्र येण्यासाठी सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव आता त्याच्या मूळ हेतूपासून दुरावला आहे. आता ते शक्ती प्रदर्शनाचे माध्यम झाले आहे. सहाजिकच गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढली. परिणामी घरगुती आणि व्यापाऱ्यांच्या वर्गण्यांमध्ये विभागणी झाल्याने उत्सवाचा खर्च मंडळांना पेलवत नाही. अशा मंडळांना राजकीय नेत्यांच्या जाहिरातबाजीतून आर्थिक पाठबळ मिळते. या आर्थिक गणितातून मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन मंडळे विभाजित होऊ लागली आहेत. या नव्या मंडळांच्या आडून आपापले बस्तान बसविण्याचा प्रयत्न राजकीय मंडळी करतात. मात्र पोलिसांच्या आदेशामुळे त्याला खीळ बसेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.