लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच एलफिन्स्टन महाविद्यालयातील मतमोजणी केंद्रावर मात्र सकाळी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा निरुत्साह दिसून आला. काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांचीही अनुपस्थिती खटकत होती. या केंद्रावर सकाळीच केवळ ‘आप’ आणि अपक्ष उमेदवाराने हजेरी लावली. पण अपक्ष उमेदवाराला तांत्रिक कारणामुळे केंद्रात प्रवेश करता आला नाही. परिणामी तेथे पोलीस आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचीच गर्दी दिसत होती. हळूहळू निकाल स्पष्ट होऊ लागताच शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्ते काळाघोडा परिसरात जमले आणि त्यांनी सारा परिसर घोषणाबाजीने दणाणून सोडला.
‘नमो’च्या जपामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक होतीच. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते मतमोजणी केंद्राकडे फिरकलेच नाहीत. शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचीही तशीच अवस्था होती. मात्र ‘आप’च्या उमेदवार मीरा सन्याल आणि अपक्ष उमेदवार गौरव शर्मा एलफिन्स्टन कॉलेजवर पोहोचले. परंतु उमेदवार असल्याने गौरव शर्मा यांना प्रवेश नाकारण्यात आला. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर ते घरी परतले. दुपारी पुन्हा ते मतमोजणी केंद्रावर पोहोचले. त्यावेळी इतर पक्षाचे उमेदवार तेथे येऊन गेले होते. त्यामुळे गौरव शर्मा यांना मतमोजणी केंद्रात सोडण्यात आले. परंतु पोलिसांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे नाराज होऊन ते माघारी परतले.
येथील मुख्य उमेदवार काँग्रेसचे मिलिंद देवरा, शिवसेनेचे अरिवद सावंत आणि मनसेचे बाळा नांदगावकर सकाळी मतमोजणी केंद्राकडे फिरकले नाहीत. आपापल्या घरीच परिवार आणि मित्रांसमवेत वृत्तवाहिन्यांवर निकालाचा आढावा ते घेत होते. मतमोजणीचा कल पाहून अरविंद सावंत दुपारी बारा-साडेबाराच्या सुमारास परळच्या शिवसेना शाखेत गेले. तेथून दुपारी दीड-दोनच्या सुमारास ते शिवसैनिकांसह ते एलफिन्स्टन कॉलेजमधील मतमोजणी केंद्रावर पोहोचले. तेथे वाट पाहात असलेल्या शिवसैनिकांनी अरविंद सावंत यांना पाहताच एकच जल्लोष केला. ढोल-ताशा, कच्छी बाजाच्या तालावर ठेका धरत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी यांच्या नावाने घोषणा देऊन सारा परिसर दणाणून सोडला. पराभवाची चाहूल लागली असतानाही मिलिंद देवरा दुपारी दोनच्या सुमारास मतमोजणी केंद्रावर आले. काही काळ मतमोजणीचा आढावा घेऊन तेही केंद्रातून बाहेर पडले आणि आपल्या गाडीत बसून निघून गेले.