नवी मुंबईत सध्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि चौक सभांनी सर्व राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी मतदारांपर्यत पोहचण्याचा सपाटा सुरु केला आहे. रविवारी सुट्टीचा दिवस साधत ऐरोली अणि बेलापुर येथील राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी चर्च, दर्गा, मंदिर व गुरुद्वाराला भेटी देऊन विजयासाठी साकडे घातले.
नवी मुंबईत शिवसेना, मनसे, भाजप, राष्ट्रवादी, कॉग्रेस अशी पंचरगी लढत होणार आहे. निवडणुकीला अवघे १० दिवसे उरले असताना ऐरोली आणि बेलापुर विधानसभा मतदार संघात सर्वच राजकीय पक्षाचे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत मश्गुल आहेत. बाईक रॅली, चौक सभा, महिला बचत गटाचे मेळावे, हळदीकुंकु अशा कार्यक्रमांची सध्या रेलचेल सुरू आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकारी स्थानिक पातळीवर कार्यरत असताना राजकीय नेते मात्र व्हॉटसअप, फेसबुक च्या हायटेक प्रचाराबरोबरच विविध धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना भेटी देत आहेत. रविवारी बेलापुर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार गणेश नाईक यांनी नेरुळ आणि सानपाडा येथील चर्च आणि गुरुद्वाराला भेट दिली तर कॉग्रेसचे उमेदवार नामेदव भगत यांनीही गुरुद्वाराला भेट दिली. शिवसेनेचे उमेदवार विजय नाहटा, भाजपाच्या उमेदवार मंदा म्हात्रेही धार्मिक स्थळांना भेटी देत आहेत.
ऐरोली विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप नाईक, शिवसेनेचे विजय चौगुले, भाजपाचे वैभव नाईक यांनी धार्मिक स्थळांना भेटी दिल्या.
या निवडणुकीत आपणच विजयी होणार असा विश्वास व्यक्त करत सर्वच उमेदवारांनी विजयासाठी आता देवाला साकडे घातले आहे. त्यामुळे प्रार्थनास्थळांना निवडणूक प्रचार केंद्रांची अवकळा आली आहे.