सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून राजकारण रंगू लागले

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीवरून राजकारण खेळले जात असल्याचे शिवसेनेच्या आंदोलनावरून स्पष्ट झाले आहे.

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीवरून राजकारण खेळले जात असल्याचे शिवसेनेच्या आंदोलनावरून स्पष्ट झाले आहे. शिवसैनिकांनी विद्यापीठाच्या अधिकृत नामफलकावर अहल्यादेवी होळकर विद्यापीठाचा फलक परस्पर लावून टाकला.
विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर यांच्या कार्यकाळात झालेला बाकडे घोटाळा तसेच कथित बेकायदा नोकरभरती व अन्य प्रकरणांची सध्या उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. विद्यमान कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार हे प्रामाणिकपणे व पारदर्शक स्वरूपाचा कारभार पाहात विद्यापीठाची मलिन झालेली प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या पाश्र्वभूमीवर अचानकपणे या विद्यापीठाला अहल्यादेवी होळकरांचे नाव देण्याची मागणी जोर धरत आहे. त्यासाठ़ी धनगर समाज संघटनेने येत्या २८ मे रोजी मोर्चा काढण्याचे ठरविले आहे. या आंदोलनात समस्त धनगर समाजाला एकत्र केले जात आहे.
या आंदोलनाबद्दल सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत असताना शिवसेनेने अचानकपणे या नामांतर आंदोलनात उडी घेतली. सेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे व शहरप्रमुख प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरील विद्यापीठाच्या नामफलकावर अहल्यादेवी होळकर विद्यापीठ असा नामफलक लावला. या आंदोलनात महेश धाराशिवकर, विष्णू कारमपुरी, अमर पुदाले, विजय पुकाळे, श्रावण भंवर, भारत खटके, धनराज जानकर, उज्ज्वल दीक्षित आदींचा सहभाग होता. हे आंदोलन प्रतीकात्मक असल्याचे शहरप्रममुख प्रताप चव्हाण यांनी सांगितले. तथापि, बेकायदेशीरपणे लावण्यात आलेले हे नामफलक हटवण्याची कायदेशीर कार्यवाही होणार काय, असा सवाल उपस्थित केला असता कुलगुरू डॉ. मालदार यांनी यासंदर्भात विधान सल्लागाराचा सल्ला घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
संपूर्ण देशात एकमेव सोलापूर जिल्हय़ासाठी २००४ साली सोलापूर विद्यापीठाची उभारणी करण्यात आली होती. परंतु निधी उपलब्ध न झाल्याने या विद्यापीठाची अवस्था कुपोषित बालकासारखी झाली आहे. त्यातच गैरकारभाराचा रोग झाल्याने विद्यापीठाचा वाढ खुंटली आहे. तिसरे कुलगुरू डॉ. मालदार यांनी अल्पावधीत विद्यापीठाच्या कारभारात पारदर्शकता आणत स्वत:चा ठसा निमाण केला आहे. विशेषत: विद्यापीठाला ‘बारा ब’चा दर्जा प्राप्त होण्यासाठी सकारात्मक पावले पडत आहेत. त्यामुळे सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रातील अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र आता नामांतराच्या मागणीवरून घेण्यात आलेल्या या आंदोलनाचा माजी कुलगुरू डॉ. बंडगर यांच्या कथित कारभाराच्या चौकशी प्रकरणाचा संबंध नसल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून केला जात असला तरी त्याबद्दल शैक्षणिक क्षेत्रात हा वादाचा विषय झाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Politics over renaming of solapur university