सातारा येथील रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट व सातारकर नागरिकांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा सातारा भूषण पुरस्कार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे.
रा. ना. गोडबोले ट्रस्टच्या वतीने १९९१ पासून विविध क्षेत्रांत निस्पृहपणे कार्य करणाऱ्यांना सातारा भूषण पुरस्काराने गौरविण्यात येते. या पुरस्काराचे हे २३ वे वर्ष आहे. २१ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वीचे पुरस्कार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्राचार्य शिवाजीराव भेसले, डॉ. नीलकंठ कल्याणी, राजमाता सुमित्राराजे भोसले, सयाजी शिंदे आदींना देण्यात आले आहेत. डॉ. दाभोलकर यांनी विद्यार्थिदशेपासून सामाजिक कार्याला समíपत केले होते. समाजवादी युवक दल, एकता शिक्षण प्रसारक मंडळ, व्यसनमुक्ती, समता आंदोलन, जाती निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन आदी चळवळीत भाग घेतला व नेतृत्व केले. त्यांच्या लोकोत्तर कार्यास व बलिदानास अभिवादन करण्याच्या उद्दिष्टाने व त्यांच्या लोकात्तर कार्यास बळ देण्याचे उद्दिष्टाने त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गोडबोले यांनी सांगितले.