प्राचीन भारतीय साहित्य, संस्कृती आणि इतिहासाच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरणारे हजारो दुर्मीळ ग्रंथ, हस्तलिखिते तसेच शिल्पांचा अमूल्य संग्रह असणाऱ्या ठाण्यातील प्राच्य विद्या अभ्यास संस्थेचे कामकाज महापालिका प्रशासनाच्या अनास्थेमुळे गेली तब्बल तीन वर्षे ठप्प आहे. वारंवार विनंती करूनही महापालिका प्रशासनाने हाजुरी येथील नव्या जागेत संस्थेला आवश्यक साधने न पुरविल्यामुळे शाहू मार्केटमधील वास्तूतून हलविल्यापासून ही पुस्तके खोक्यांमध्ये बंद अवस्थेतच आहेत. या नव्या इमारतीचे छत पावसाळ्यात गळत असून दमटपणामुळे वाळवी लागून ती नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी या संदर्भात महापालिका आयुक्तांना पाठविलेल्या अखेरच्या निर्वाणीच्या पत्रात प्राचीन दस्तऐवजांकडे अक्षम्य दुर्लक्ष करून क्लस्टर, मेट्रो आदी मोठय़ा प्रकल्पांची स्वप्ने साकार करण्याच्या महापालिकेच्या धोरणास ‘शुभेच्छा’ दिल्या आहेत.   
गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ ठाणे शहरात कार्यरत प्राच्यविद्या संस्थेत ४० हजारांहून अधिक दुर्मीळ ग्रंथ आहेत. त्यातील अनेक ग्रंथ १९ व्या शतकातील आहेत. त्या व्यतिरिक्त तीन हजार संस्कृत हस्तलिखिते आहेत. देशभरातील विविध नामांकित ग्रंथालयांमध्ये असणाऱ्या ग्रंथांच्या सूची येथे उपलब्ध आहेत. ठाणे परिसरात सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीच्या खुणा आढळून येतात. त्यात शिलाहारकालीन (इ.स. ८०० ते १२००) पाषाणशिल्प आणि शिलालेखांचे प्रमाण अधिक आहे. ठाणे जिल्ह्य़ात वस्तुसंग्रहालय नसल्याने ‘प्राच्य विद्या’ने अशा अनेक ऐतिहासिक साधनांचे जतन केले आहे.
नौपाडय़ातील शाहू मार्केटमधील वास्तूत संस्था कार्यरत असताना अनेक अभ्यासक, संशोधक या ग्रंथांचा आणि साधनांचा उपयोग करून घेत होते.
ठाणे शहरातील एक उत्तम संदर्भ ग्रंथालय असा संस्थेचा लौकिक होता. गेल्या
२५ वर्षांत संस्थेने विविध विषयांवरील ३२ राष्ट्रीय परिषदा भरविल्या. त्यात देशभरातील ६५० तर परदेशातील २० अभ्यासकांनी शोधनिबंध वाचले. विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरै संस्थेतर्फे आयोजित करण्यात आले. मात्र महापालिका प्रशासनाने हट्टाने ‘प्राच्य विद्या..’ हाजुरी येथील नव्या जागेत हलविले. मात्र पुस्तकांची मांडणी करण्यासाठी लागणारी अत्यावश्यक साधनेही आश्वासन देऊनही दिलेली नाहीत. त्यामुळे संस्थेचे कामकाज गेली तीन वर्षे
ठप्पच आहे.
हा तर निव्वळ प्रशासकीय अहंकार
अत्यंत घाईघाईने हाजुरी येथील इमारतीचे काम अपूर्ण असताना प्राच्य विद्या अभ्यास केंद्राचे स्थलांतर करण्यात आले. त्याला आता तीन वर्षे झाली तरी शाहू मार्केटमधील जागा तशीच पडून आहे. म्हणजेच ठाणे शहराचे भूषण करणारे हे संशोधन केंद्र केवळ प्रशासकीय अहंकाराचे बळी ठरले. खरे तर लोकप्रतिनिधींनी याबाबतीत संवेदनशील भूमिका घेणे आवश्यक होते, पण ते उदासीन राहिले, अशी खंत संस्थेचे डॉ. विजय बेडेकर यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना व्यक्त केली. संस्थेत असणारे दुर्मीळ दस्तऐवज माझे एकटय़ाचे नाहीत. ते साऱ्या शहराचे वैभव आहे. त्यामुळे याबाबतीत महापालिकेकडे यापुढे कोणताही पत्रव्यवहार करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.    

गळती तातडीने रोखणार
हाजुरी येथील इमारतीच्या छताची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश आयुक्तांनी सोमवारी दिले आहेत. मंगळवारपासून ते काम सुरू होईल. तसेच प्राच्य विद्या अभ्यास केंद्रातील इतर असुविधांबाबत येत्या आठवडाभरात सर्व संबंधितांची बैठक घेण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.