भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे वजनदार नेते प्रफुल पटेल यांच्या पराभवामागे मोदी लाट, देशांतर्गत दिसलेली परिवर्तनाची मानसिकता, युपीए शासनकाळातील घोटाळे, वाढलेली महागाई, यासह अनेक कारणे असली तरी स्थानिक पातळीवरील कारणमीमांसा केली असता त्यांच्या अवतीभवती घुटमळणारे मोजके नेते, निवडणुकीतील प्रचारादरम्यान तळागाळातील प्रचाराकडे झालेले दुर्लक्ष, पदाधिकारी व त्यांनी गेल्या निवडणुकीचा आधार घेत बाळगलेला फाजील आत्मविश्वास, ही प्रमुख कारणे आहेत.
मतदारांच्या तोंडून निघालेल्या शब्दावरून तर त्यांच्याकडे असलेले कार्यकत्रे आपल्या नेत्याकरिता नव्हे, तर नेत्याचे वजन आणि पसा स्वतला कसा मिळेल, याचे गणित करण्यात लागलेले असतात. त्यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्य़ात नेमलेले विश्वासू प्रतिनिधी स्वतला पटेलांपेक्षा मोठे समजू लागले. कामाकरिता आलेल्या सर्वसामान्यांना उद्धटपणे बाहेर पाठवायचे. कोणत्याही कामाकडे माणुसकीऐवजी पशाच्या तुलनेने बघणेही होतेच.
 जिल्ह्य़ात दौरे करीत असतांना एका विशिष्ट गराडय़ात राहून फक्त सभा घेणे, प्रत्यक्ष नागरिकांच्या समस्या ऐकून न घेता त्या सोडविण्याकरिता पाठपुराव्याचा अभाव, त्यातच राजकीयदृष्टय़ा आपल्या वजनाचा वापर करून गेल्या दहा वर्षांत केंद्रात एक महत्वाचे मंत्री असतांना आपल्या कृषीप्रधान मतदारसंघात शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग, पर्यटन, अशा अनेक रोजगारांच्या संधी उपलब्ध करता आल्या असत्या. मात्र, त्यासाठी करण्यात न आलेले प्रयत्न, अशी अनेक कारणे सर्वसामान्य मतदार आपापल्या परीने बोलून दाखवित आहे. गेल्या दहा वर्षांतील कार्यकाळ बघता मतदारसंघातील जातीय समीकरणांचे अत्याधिक महत्व लक्षात घेऊन पटेलांनी अनेक महत्वाची पदे त्या समाजातील नेत्यांना बहाल केली, परंतु पदे भूषविणारे आणि महामंडळाचे लालदिवे मिरविणारे किती दिवे लावतात, याकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. यासह पटेलांच्या मागे प्रत्येक निवडणुकीत ठामपणे उभे राहणाऱ्या मुस्लिम व दलित समाजाला मोक्याच्या जागा देण्यात आल्या नाही.
या मतदारसंघातील पोवार समाजाकडे दुर्लक्ष करण्यात आले. पटेलांच्या आर्शीवादाने पदे मिळालेले अनेक नेते व पदाधिकारी लोकाभिमुख असले तरी त्यांचे वर्तन पुढच्यांचा पानउतारा करणारे होते. निवडणुकीत पशाच्या बळावर काहीही करता येते, या गैरसमजात ते राहिले. विकासकामांशिवाय सर्वसामान्यांशी सातत्याने संवाद व संपर्काचा अभावामुळे सर्वसामान्यांना पटेल आपलेसे वाटण्यात आता स्वारस्य राहिलेले नव्हते. त्या तुलनेत शेतकरी पुत्र पटोले यांची ओळखच सर्वसामान्यांचा नेता म्हणून आहे.
शेतकऱ्यांच्या कैवारी आणि नागरिकांच्या प्रश्नांकरिता अध्र्या रात्रीही धावून येणारा नेता, अशी प्रतिमा आहे. सर्वसामान्यांचे लग्न वा तेरवी किंवा मरण अशा घरगुती कार्यक्रमांनाही नाना पटोलेंची हजेरी नागरिकांची पसंती मिळवून गेली.