प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी मंगळवारी पनवेल येथील नियोजित नाटय़गृहाला सदिच्छा भेट देऊन त्याची पाहणी केली. पनवेल नगरपालिकेतर्फे शहराच्या मध्यवर्ती भागात क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या नावाने हे नाटय़गृह उभारले गेले असून लवकरच ते रसिकांसाठी खुले होणार आहे. लोकार्पणापूर्वीच ते चच्रेत आल्याने रसिकांमध्ये तसेच कलाकारांमध्ये त्याबाबत उत्सुकता आहे, याच पाश्र्वभूमीवर दामले यांनी आवर्जून या नाटय़गृहाला भेट दिली.
प्रशांत दामले म्हणाले की, चहूअंगाने वाढत असलेल्या आणि प्रत्येक क्षेत्रात विकसनशील असलेल्या पनवेलसारख्या शहरात अनेक कलाकारही वास्तव्य करतात. या कलाकारांसाठी तसेच आमच्यासारख्या मुंबई-ठाण्यातील कलाकारांसाठी येथे एक सुसज्ज नाटय़गृह उभे राहणे, ही काळाची गरज होती, ती आता पूर्ण झाली आहे. हे नाटय़गृह मुंबईतील नाटय़गृहांच्या तोडीचे असून त्यात कोणतीही कसूर ठेवण्यात आली नाही, याचा आनंद वाटतो. या रंगमंचावरून रसिकांची सेवा करण्याची संधी कधी मिळते, याची प्रतीक्षा मी करत आहे.
या नाटय़गृहामुळे पनवेलच्या वैशिष्टय़ांमध्ये भर पडेल, असेही ते म्हणाले. दामले यांनी या वेळी नाटय़गृहासंबंधी काही तांत्रिक सूचनाही केल्या. माजी खासदार रामशेठ ठाकूर, नगराध्यक्षा चारुशीला घरत, उपनगराध्यक्ष मदन कोळी, मराठी नाटय़निर्माता संघाचे सचिव दिलीप जाधव, नगरसेवक प्रथमेश सोमण, अ. भा. नाटय़ परिषदेच्या पनवेल शाखेचे परेश ठाकूर, शैलेश कठापूरकर, श्यामनाथ पुंडे आदी उपस्थित होते.
विष्णुदासला पर्याय
पनवेल, उरण परिसरातील नाटय़प्रेमींना नाटकांची हौस भागविण्यासाठी आतापर्यंत वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहाचाच जवळचा पर्याय होता. या नाटय़गृहाच्या निमित्ताने पनवेलकरांना हक्काचे नाटय़गृह मिळणार आहे.  अंतर्गत सजावटीचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून येत्या महिनाभरात त्याचे लोकार्पण होईल, असे समजते. हे नाटय़गृह केवळ राजकीय कार्यक्रमांचे आश्रयस्थान न होता तेथे नव्याने नाटय़चळवळ रुजावी, अशी अपेक्षा रसिक करत आहेत.