राज्यात सर्वात कमी पाऊस झालेल्या जालना जिल्ह्य़ातील दुष्काळाच्या पाहणीसाठी राज्यपाल मार्चच्या पहिल्या आठवडय़ात दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. या संभाव्य दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर आवश्यक पूर्वतयारीसाठी जिल्हा प्रशासनाची लगबग सुरू आहे. राज्यपालांना सादर करण्यात येणाऱ्या पिकांचे नुकसान, पाणीटंचाई, चाराटंचाई, रोजगार हमीची कामे आदी माहितीचा आवश्यक तपशील इंग्रजीतून तयार करण्यात येत आहे. राज्यपाल आपल्या दौऱ्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेतील. तसेच दुष्काळी भागातील रोजगार हमी कामांना भेट देण्याची शक्यता आहे. राज्यपालांचा दौरा अजून अधिकृत जाहीर झाला नसला, तरी त्याबाबत संभाव्य तारखा मात्र जिल्हा प्रशासनास कळविण्यात आल्याचे कळते. त्यामुळे सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात या अनुषंगाने पूर्वतयारी सुरू आहे. दि. ४ व ५ मार्चला राज्यपालांच्या दौऱ्याची शक्यता आहे.