मतदान प्रक्रिया झाल्यानंतर निवडणूक यंत्रणेने मतमोजणीची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील १५ मतदार संघातील मतमोजणी वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. त्यात शहरातील चारही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीही वेगवेगळ्या ठिकाणी होईल.
१५ मतदारसंघातील मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यात नाशिक पश्चिम आणि नशिक पूर्व या दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअर हाऊस येथे होणार आहे. नाशिक मध्य मतदारसंघाची मतमोजणी त्र्यंबक नाक्यावरील शासकीय तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, देवळालीचे पंचवटी विभागीय कार्यालय, नांदगाव मतदारसंघाचे नांदगाव-औरंगाबाद रस्त्यावरील नवीन तहसीलदार कार्यालय, मालेगाव (मध्य) संगमेश्वर भागातील शिवाजी जिमखाना, मालेगाव (बाह्य) एमएसजी महाविद्यालयाजवळील ऐश्वर्या मंगल कार्यालय, बागलाणचे सटाणा बाक्षी रस्त्यावरील गुरुप्रसाद मंगल कार्यालय, कळवणचे कोल्हापूर फाटा (मानूर) येथील नवीन प्रशासकीय इमारत, चांदवड मतदार संघाचे मनमाड रस्त्यावरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, येवला बाभूळगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिन्नर जेएमडी महाविद्यालय, निफाड मतदारसंघाचे कुंदेवाडी रस्त्यावरील कर्मवीर गणपत दादा मोरे महाविद्यालय, दिंडोरी मतदारसंघाचे दिंडोरीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि इगतपुरी मतदारसंघाचे मतदान नाशिक शहरातील शासकीय कन्या महाविद्यालयात होणार आहे.